जलसंपदा विभागाचे दोनशे कोटी थकले
By Admin | Published: July 15, 2016 12:43 AM2016-07-15T00:43:02+5:302016-07-15T01:11:17+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका जलसंपदा विभागाच्या पाणीपट्टी वसुलीलाही बसला आहे. सिंचनाच्या पाणीपट्टीची वसुली जवळपास ठप्प झाली आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका जलसंपदा विभागाच्या पाणीपट्टी वसुलीलाही बसला आहे. सिंचनाच्या पाणीपट्टीची वसुली जवळपास ठप्प झाली आहे. परिणामी थकबाकीचा आकडा वाढला आहे. सद्य:स्थितीत जलसंपदा खात्याचे सिंचन आणि बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीचे तब्बल दोनशे कोटी रुपये थकले आहेत.
जलसंपदा विभागाच्या धरणांमधून सिंचनासाठी तसेच बिगर सिंचनासाठी (पिण्यासाठी, उद्योगांसाठी) पाणीपुरवठा केला जातो. त्याकरिता वेगवेगळ्या दराने पाणीपट्टी आकारली जाते.
मात्र, गेल्या चार वर्षांपासून संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतीच्या पाणीपट्टीची वसुली जवळपास ठप्प झाली आहे. याशिवाय बिगर सिंचनाच्या थकीत पाणीपट्टीचा आकडाही वाढला आहे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) च्या औरंगाबाद मंडळांतर्गत सद्य:स्थितीत सिंचन आणि बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीचे तब्बल २०८ कोटी रुपये थकले आहेत. या मंडळांर्तगत औरंगाबाद, जालना आणि परभणी हे जिल्हे येतात.
याशिवाय जायकवाडी धरणावरून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आणि नेवासा या दोन तालुक्यांतील काही भागालाही पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ही सर्व पाणीपट्टी वरील तीन जिल्हे आणि शेवगाव व नेवासा ह्या दोन तालुक्यांमधील आहे. औरंगाबाद मंडळ कार्यालयांतर्गत जूनअखेरपर्यंत सिंचनाच्या पाणीपट्टीचे १०३ कोटी आणि बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीचे १०८ कोटी रुपये थकले आहेत. बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीमध्ये उद्योगांबरोबरच ग्रामपंचायती, नगर परिषदा आणि मनपाच्या थकीत पणीपट्टीचा समावेश आहे. आता जलसंपदा विभागाकडून थकबाकीच्या वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, १ एप्रिलपासून जूनअखेरपर्यंत या कार्यालयाने ५ कोटी रुपयांची वसुली केली आहे. यामध्ये सिंचनाची ४ लाख आणि बिगर सिंचनाची ५ कोटी ८५ लाख रुपये इतकी पाणीपट्टी आहे. चालू वर्षात सुमारे ३५ कोटी रुपयांची पाणीपट्टी आकारणी होण्याचा अंदाज आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे सिंचनाची अपेक्षित पाणीपट्टी वसुली झाली नाही. आता सिंचन आणि बिगर सिंचन या दोन्ही पाणीपट्टींच्या वसुलीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. चालू वर्षाच्या पाणीपट्टीसोबतच थकबाकीचीही वसुली केली जाणार आहे.
- जे. एन. हिरे, सहायक अधीक्षक अभियंता, कडा