सोनखेड्यात दोनशे वर्षांपूर्वीच्या झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:03 AM2021-09-03T04:03:26+5:302021-09-03T04:03:26+5:30
खुलताबाद : ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी न घेता सोनखेडा ग्रा.पं. सदस्याने गावातील दोनशे वर्षांपूर्वीची दोन झाडे परस्पर तोडण्याचे आदेश दिले. ...
खुलताबाद : ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी न घेता सोनखेडा ग्रा.पं. सदस्याने गावातील दोनशे वर्षांपूर्वीची दोन झाडे परस्पर तोडण्याचे आदेश दिले. व्यापाऱ्याने ही झाडे तोडली असून याप्रकरणी त्या सदस्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा ग्रामपंचायतीच्या बाजूला असलेले चिंचेचे झाड व सामाजिक सभागृहाच्या बाजूला असलेले लिंबाचे झाड हे दोनशे वर्षांपूर्वीचे आहे. ही दोन्हीही झाडे ग्राम पंचायतीच्या मालकीची आहेत. ग्रा.पं. सदस्य राजेंद्र नामदेव कसारे यांनी लाकडाचे व्यापारी पुंडलिक महादू वाकळे यांना परस्पर ही दोन्ही झाडे तोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे वाकळे यांनी ती तोडून टाकली. विशेष म्हणजे यासाठी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. झाडे तोडल्यानंतर ग्रामसेवक जनार्दन आधाने यांनी २९ ऑगस्ट रोजी पाच पंचांसमक्ष पंचनामा केला. यात ग्रा.पं. सदस्य राजेंद्र कसारे यांच्या आदेशानुसार झाडे तोडल्याचा जबाब लाकडाचे व्यापारी पुंडलिक वाकळे यांनी दिल्याचे नमूद आहे. याप्रकरणी संबंधित ग्रामपंचायत सदस्यावर कायदेशीर कारवाई करण्याची लेखी तक्रार सोनखेडा गावातील संतोष अंबादास लाटे यांनी तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
चौकट
ग्रामसभेत झाडांच्या कत्तलीविषयी चर्चा
सोनखेडा ग्रामपंचायतीत मंगळवारी ग्रामसभा सरपंच ललिता सोनवणे व जि. प. सदस्य सुरेश सोनवणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या ग्रामसभेत गावात अवैधरीत्या तोडण्यात आलेल्या झाडांच्या बाबत चर्चा होऊन कुणीही पूर्वपरवानगीशिवाय झाडे तोडू नये, असा ठराव घेतला, तसेच ही दोन्ही झाडे तोडण्यास जबाबदार असणाऱ्या तिघांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंडही आकारण्यात आल्याचे समजते.
कोट
सोनखेडा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दोन जुनी झाडे तोडण्यात आली असून याप्रकरणी २९ ऑगस्ट रोजी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला आहे. तसेच तोडलेल्या लिंबाच्या झाडांची लाकडेही जप्त करण्यात आली आहेत.
- जनार्दन आधाने, ग्रामसेवक
कोट
सोनखेडा ग्रामपंचायत हद्दीतील दोन जुनी झाडे तोडल्याची मला माहिती नाही. याबाबत माहिती घेऊन चौकशी करतो.
- प्रवीण सुरडकर, गटविकास अधिकारी, पं. स. खुलताबाद
फोटो कॅप्शन : सोनखेडा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दोनशे वर्षांपूर्वीच्या झाडांची झालेली अवैधरीत्या कत्तल.
020921\img-20210902-wa0021.jpg
सोनखेडा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दोनशे वर्षांपूर्वी च्या झाडांची झालेली अवैधरित्या कत्तल