सुशिक्षित बेरोजगारांना फसविणाऱ्या टोळीतील दोन गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:32 AM2019-02-28T00:32:04+5:302019-02-28T00:32:48+5:30
औरंगाबाद : विमान प्राधिकरणात नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोगारांना फसविणाऱ्या टोळीतील दोघांना औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली.
औरंगाबाद : विमान प्राधिकरणात नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोगारांना फसविणाऱ्या टोळीतील दोघांना औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली.
तौफिक हानीफ पटेल (रा. ऐरोली, नवी मुंबई), सचिन ऊर्फ अजय सिंह (३३, रा. वसई), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. रामदास तातेराव खवळे (२८, रा. औराळा, ता. कन्नड) यांच्या बहिणीची दोन मुले असून, त्यांच्यासाठी वृत्तपत्रात आलेल्या विमान प्राधिकरणाविषयीच्या जाहिरातीवरून अर्ज दाखल केला होता. आरोपींनी त्यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क करून निवड झाल्याची थाप मारली. बँक खात्यात २ हजार रुपये टाकण्यास सांगितले. पुन्हा ७,५०० रुपये पाठवा, त्यातून शूज व कपड्याचा खर्च काढला जाणार आहे. काही दिवसांत तुम्हाला ड्यूटीवर बोलाविले जाईल, अशी कागदपत्रे व्हॉटस्अॅपवर पाठविण्यात आली. खूप दिवस झाल्यानंतरही काही खुलासा न झाल्याने अखेर खवले यांनी वैजापूर येथे आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला.
प्रकरण सायबर सेलकडे वर्ग
सायबर सेलचे पोलीस निरीक्षक अशोक घुले यांनी सखोल चौकशी करून वेगवेगळे ५ ते ६ खाते शोधले की, त्यावरून व्यवहार झाले आहेत. त्याचा आधार घेऊन बीड येथील व्यक्तीने तौफिक हानीफ पटेल यास ओळखले. खबºयाकडून मिळालेल्या माहितीवरून ऐरोली येथून त्याला ताब्यात घेतले. त्याचे एसएस इंटरप्राईजेस प्रॉपर्टी सोल्युशन दुकान आनंदनगर वसई भागात आहे. माणिकनगर वसई पोलिसांच्या मदतीने सचिन कैलासनाथ सिंह (३३) यास ताब्यात घेतले.
बेरोजगारांची फसवणूक
जाहिराती पाहून बेरोजगारांनी दाखल केलेल्या अर्जावरून त्यांना नोकरीचे आमिष दाखवून पैसे लुबाडण्याचे काम सचिन ऊर्फ अजयसिंग व त्याच्या पत्नीने केले आहे. या दाम्पत्याने ५०० ते ६०० बेरोजगारांना फसविल्याची माहिती समोर येत आहे. प्रॉपर्टी डिलिंग व इतर व्यवसायांत त्याने वेगवेगळ्या खात्यांतून कोटींच्या वर व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याकडील ६ एटीएम कार्ड, मोबाईल सीमकार्ड, लॅपटॉप व इतर साहित्य सायबर टीमने जप्त केले आहे. या टोळीने महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा इत्यादी राज्यांतही फसवणूक केली आहे.
आरोपींना मुंबईहून आणण्याची कारवाई निरीक्षक अशोक घुले, पोलीस उपनिरीक्षक मोहसीन सय्यद, पोलीस नाईक कैलास कामठे, रवींद्र लोखंडे, योगेश तरमाळे, योगेश दारवंटे, जीवन घोलप, गजानन बनसोड आदींच्या टीमने केली आहे.