जेसीबी चोरणारे दोन अटकेत, आणखी गुन्हे उघडकीस येऊ शकतात पोलिसांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 07:03 PM2017-09-21T19:03:18+5:302017-09-21T19:03:57+5:30
माळीवाडा येथे उभा केलेला जेसीबी चोरून नेणा-या दोन चोरट्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी जेरबंद केले. त्यांनी अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले असावेत, अशी शक्यता पोलीस अधिका-यांनी वर्तविली आहे.
औरंगाबाद, दि. 21 : माळीवाडा येथे उभा केलेला जेसीबी चोरून नेणा-या दोन चोरट्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीचा जेसीबी जप्त करण्यात आला.शंकर गायकवाड (रा. पळसखेडा दौलत, ता. चिखली, जि. बुलडाणा) आणि राजेंद्र लक्ष्मण गुळवे (रा. जेहूर, ता. कन्नड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांनी अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले असावेत, अशी शक्यता पोलीस अधिका-यांनी वर्तविली आहे.
पोलिसांनी सांगितले की, माळीवाडा येथील रहिवासी गणेश भाऊसाहेब मुळे यांनी ८ सप्टेंबर रोजी त्यांच्या शेतात जेसीबी (क्र . एमएच-२०, सीएच ६८३७) उभा करून ठेवला होता. सात लाख रुपये किमतीचा हा जेसीबी चोरट्यांनी पळविल्याचे दुस-या दिवशी त्यांना समजले. याप्रकरणी त्यांनी दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. याबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोहेकाँ. संतोष सोनवणे, विजयानंद गवळी, सुधाकर राठोड, लालखाँ पठाण, नंदलाल चव्हाण, योगेश गुप्ता, धर्मा गायकवाड, सिद्धार्थ थोरात, नितीन धुळे यांनी चोरट्यांचा शोध सुरू केला.
माळीवाडा परिसरातून बाहेर जाणा-या मुख्य रस्त्याने शंकर गायकवाड हा जेसीबी घेऊन जाताना दिसल्याची माहिती खब-याने पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी शंकरला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र गुन्ह्याची कबुली दिली. त्याचा मालक आरोपी राजेंद्र गुळवे याच्यासोबत जेसीबी चोरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी गुळवेला जेहूर येथून ताब्यात घेतले. आरोपी हे प्रथमच पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. त्यांनी आणखी अशा प्रकारचे गुन्हे केले असावेत, अशी शक्यता पोलीस अधिका-यांनी वर्तविली आहे. अधिक तपासासाठी आरोपींना दौलताबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.