औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 06:15 PM2017-09-07T18:15:01+5:302017-09-07T18:17:07+5:30
शहरातील चिकलठाणा आणि जळगाव रोडवरील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला.
औरंगाबाद, दि. 7 : शहरातील चिकलठाणा आणि जळगाव रोडवरील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.
रिक्षा उलटल्याने चालक ठार
भरधाव रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात चालक ठार झाला. हा अपघात ७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास जालना रोडवरील चिकलठाणा बाजाराजवळ घडला.
जावेद हमीद शेख (२५,रा. पुष्पक गार्डन,हिनानगर, चिकलठाणा)असे मरण पावलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, जावेद हमीद हा व्यवसायाने रिक्षाचालक होता. बुधवारी रात्री ७ ते सकाळी ७ पर्यंत अॅटो रिक्षा चालविली. यानंतर आज सकाळी तो घरी गेला. काही वेळानंतर तो पुन्हा रिक्षा घेऊन घराबाहेर पडला.
चिकलठाणा आठवडी बाजाराजवळून पुढे जात असतानाच अचानक त्याचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा पलटी झाली. या अपघातात रिक्षाचालक जावेद शेख यांच्या डोक्याला, कानाच्या बाजूने जबर मार लागल्याने ते बेशुद्ध पडले. या अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तेथील डॉक्टरांनी जावेद यास तपासून मृत घोषित केले. एमआयडीसी सिडको ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. पोलीस नाईक कोलते हे तपास करीत आहे.
जीपने मोपेडस्वारास चिरडले
अन्य एका घटनेत भरधाव जीपचालकाने मोपेडस्वाराला उडवले.या अपघातात मोपेडचालक जागीच ठार झाला. हा भीषण अपघात जळगाव रोडवरील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ दुपारी १ वाजेच्या सुमारास घडला.
भास्कर जंगबहादूर पांडे(५४,रा. संभाजी कॉलनी, सिडको एन-६)असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना सिडको पोलिसांनी सांगितले की, मयत भास्कर हे शहरातील पानटपरीचालकांना बीडी, तंबाखू आणि सोंप,सुपारी विक्री करण्याचे काम करतात. नेहमीप्रमाणे आज सकाळी ते मोपेडला लटकावलेल्या पिशव्यामध्ये सामान घेऊन विविध टपरीचालकांना माल विक्री करीत होते.
दुपारी पाऊण ते एक वाजेच्या सुमारास त्यांनी जळगाव रोडवरील रिलायन्स मॉलजवळील एका पानटपरीचालकास माल विक्री केला. यानंतर ते तेथून दुस-या टपरीचालकाकडे मोपेडने जाऊ लागले. यावेळी सिडकोबसस्थानाकडून हर्सूल टी पॉर्इंटकडे निघालेल्या भरधाव जीपचालकाने त्यांना जोराची धडक दिली.या अपघातानंतर जीपचालक तेथे न थांबता पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच नागरीकांनी त्यांना घाटीत दाखल केले.तेथील डॉक्टरांनी पांडे यांना तपासून मृत घोषित केले.