हाकेचे अंतर अन डोळ्याने दिसणारे घर गाठण्यासाठी दोन कि.मी. फेरा
By साहेबराव हिवराळे | Published: July 1, 2023 08:33 PM2023-07-01T20:33:06+5:302023-07-01T20:38:54+5:30
एक दिवस एक वसाहत: काखेत कळसा अन् गावाला वळसा ...! दत्तनगरी, सदाशिवनगर, त्रिमूर्तीनगर, व्यंकटेशनगर, अंजनीनगरवासीयांची व्यथा
छत्रपती संभाजीनगर : देवळाईतील माउलीनगर मागील गट ९०,९२,९४,९६ मागील दत्तनगरी, सदाशिवनगर, त्रिमूर्तीनगर, व्यंकटेशनगर, अंजनीनगरातून शहरात येणारे रस्तेच विकासकांनी बंद केल्याने अगदी घराजवळ असूनही नागरिकांना दोन किलोमीटरचा फेरा मारून नाईकनगरमार्गे घर गाठावे लागते.
या परिसरात अंदाजे १० डॉक्टर, २० वकील, काॅर्पोरेट सेक्टरमधील अधिकारी, सरकारी, निमसरकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, परिचारिका, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात राहतात. येथील रहिवासी मनपाकडे कर अदा करतात, तरीदेखील त्यांना मनपा मूलभूत प्रश्नांसाठी वेठीस धरताना दिसत आहे. कारण ही मंडळी ऑनलाइन तक्रारीही करू शकतात. पण आता कंटाळलेल्या नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
... अन्यथा आंदोलन
काही रस्ते बनले; परंतु इतर सुविधा तर रेंगाळलेल्याच आहेत. रस्ते मोकळे करावेत अन्यथा आंदोलन करावे लागेल.
- हेमा पाटील, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा
ज्येष्ठांना अधिक त्रास..
भिंतीपलीकडचे सर्व काही दिसते मात्र भिंत ओलांडून जाणे शक्य नाही. तातडीच्या गंभीर प्रसंगीही दूरवरून घर गाठावे लागते.
- शरद देशपांडे (ज्येष्ठ नागरिक)
घाण पाण्यातून नाइलाजाने जावे लागते...
ड्रेनेजलाइन व पाण्याचीही लाइन टाकण्यात आलेली नाही. सेफ्टी टँक ओव्हरफ्लो होऊन ते पाणी रस्त्यावर वाहते. त्यावेळी घाण पाण्यातूनच मार्ग काढावा लागतो. याविषयी ना मनपा लक्ष देते ना कुणी पदाधिकारी. प्रश्न मांडावेत कुणाकडे, असा सवाल आहे.
-प्रल्हाद बावस्कर, रहिवासी