विहिरीत दोन मजुरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:13 AM2018-12-23T01:13:35+5:302018-12-23T01:14:14+5:30

घाटनांद्रा येथील घटना : आडवे बोअर घेताना घडली दुर्घटना

Two laborers die due to electric shock in the well | विहिरीत दोन मजुरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

विहिरीत दोन मजुरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

googlenewsNext

घाटनांद्रा (जि. औरंगाबाद) : विहिरीत आडवे बोअर घेताना विजेच्या धक्क्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे शनिवारी दुपारी घडली. या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
घाटनांद्रा-पेंडगाव रस्त्यावरील दिलीप पुंजाजी गोंधळे यांच्या शेतातील विहिरीला अधिक पाणी लागण्यासाठी त्यांनी आडवे बोअर घेण्याच्या कामाचा शुभारंभ शनिवारी केला. कामाचा पहिलाच दिवस असल्याने विहिरीत सोडलेल्या मशिनरीची पूजा करून काम सुरूकरण्यात आले. विहिरीत कामासाठी उतरत असतानाच वीजप्रवाह असलेल्या वायरचा रमेश सांडू काचोळे (२२) याला धक्का लागला. आपल्या सहकाऱ्याला काय झाले म्हणून पाहावयास गेलेल्या माधवराव हरी थोरात (२५) यालासुद्धा विजेचा धक्का लागून तोही विहिरीत पडला. विजेचा धक्का इतका जबरदस्त होता की, दोघेही जागेवरच गतप्राण झाले.
या घटनेची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. दोन्ही तरुणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
गावावर शोककळा
मरण पावलेले दोघेही तरुण गरीब घराण्यातील असून, रमेश काचोळे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, एक मुलगा असा परिवार आहे, तर माधवराव थोरात यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील असा परिवार आहे. दोन तरुणांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही घरातील कमावती व्यक्ती गेल्याने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप तांबे, विकास नोहाटे, गुनावत सोनवणे, मोरे, चारनेरचे पोलीस पाटील, युसूफमिया देशमुख, घाटनांद्रा येथील पोलीस पाटील नासेर तडवी, पीरखॉ तडवी करीत आहेत.

Web Title: Two laborers die due to electric shock in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.