पार्टटाइम नोकरीच्या आमिषाने तरुणीला दोन लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:04 AM2021-04-27T04:04:11+5:302021-04-27T04:04:11+5:30
तक्रारदार शिवकन्या संजीवन ठोंबरे (२१,रा. वडमाउली, जि.बीड ) ही शिक्षणानिमित्त औरंगाबादेत राहते. ती घरी असताना २७ मार्च रोजी ...
तक्रारदार शिवकन्या संजीवन ठोंबरे (२१,रा. वडमाउली, जि.बीड ) ही शिक्षणानिमित्त औरंगाबादेत राहते. ती घरी असताना २७ मार्च रोजी एका वृत्तपत्रातील जाहिरात तिने वाचली. टेलिकॉम कंपनीत अर्धवेळ घरी बसून नोकरी करा आणि चांगला पगार मिळवा, अशा आशयाची ही जाहिरात होती. त्यानंतर तिने जाहिरातीमधील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. नोकरीची हमी देत नोंदणी म्हणून सुरुवातीला २ हजार १०० रुपये फोन-पेवरून पाठवायला लावले. यानंतर तरुणीने आरोपीच्या सांगण्यावरून तिची शैक्षणिक कागदपत्रे, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्ट फोटो पाठविले. ही कागदपत्रे मिळताच आरोपींनी तिला रिलायन्स कंपनीचे त्यांच्या नावे नियुक्तिपत्र (जॉइनिंग लेटर) ऑनलाइन पाठविले. कंपनीकडून त्यांना लॅपटॉप आणि मोबाइल मिळणार आहे. यासाठी सुरक्षा ठेव म्हणून त्यांनी तिला पुन्हा ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगितले. ही रक्कम पाठविल्यावर आरोपींनी तिला तुम्ही इन्कम टॅक्स भरणा करीत नसल्याचे कारण देत आणखी पैसे भरायला सांगितले. तिने तब्बल एक लाख ९२ हजार ३० रुपये पाठविल्यानंतरही आरोपींकडून पैशाची मागणी सुरूच होती. यामुळे संशय वाढल्याने तिने आरोपींनी त्यांना दिलेल्या नियुक्तिपत्रावरील पत्ता खरा आहे का याची पडताळणी केली. तेव्हा हा सर्व ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार असल्याचे तिला समजले. यानंतर तिने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या तक्रारीत तथ्य असल्यामुळे शनिवारी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात सायबर गुन्हेगाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक शरद इंगळे तपास करीत आहेत.