दोन लाईनमन जेरबंद
By Admin | Published: January 17, 2017 12:15 AM2017-01-17T00:15:52+5:302017-01-17T00:17:24+5:30
तुळजापूर : विद्युत कनेक्शनसाठी सहा हजाराची लाच घेणाऱ्या पाचुंदा येथील ३३/ ११ केव्ही सबस्टेशनच्या दोन लाईनमनविरूध्द लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी दुपारी कारवाई केली़
तुळजापूर : विद्युत कनेक्शनसाठी सहा हजाराची लाच घेणाऱ्या पाचुंदा येथील ३३/ ११ केव्ही सबस्टेशनच्या दोन लाईनमनविरूध्द लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी दुपारी कारवाई केली़ ही कारवाई तालुक्यातील पाचुंदा येथे करण्यात आली असून, या प्रकरणी तंत्रज्ञ प्रदीप काकासाहेब साठे, तंत्रज्ञ नवीनकुमार इरलवार यांच्याविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील तक्रारदाराच्या वहिनींच्या घरात नवीन विद्युत कनेक्शन घ्यायचे होते़ त्यामुळे तक्रारदार आवश्यक कागदपत्रांसह अर्ज घेऊन तंत्रज्ञ (लाईनमन) प्रदीप काकासाहेब साठे यांच्याकडे देण्यासाठी गेले होते़ त्यावेळी साठे यांनी नवीन विद्युत जोडणीचा सर्वे देण्यासाठी व विद्युत कनेक्शन जोडणीसाठी सहा हजार रूपये लाचेची मागणी केली़ त्याबाबतची तक्रार तक्रारदाराने उस्मानाबादेतील लाचलूचपत प्रतिबंध विभागाकडे केली होती़ या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक गवारे, उपाधीक्षक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आसिफ शेख, पोनि बाळासाहेब आघाव, पोहेकॉ बसवेश्वर चनशेट्टी, रवींद्र कठारे, पोना पांडुरंग डंबरे, बालाजी तोडकर, नितीन सुरवसे, पोकॉ राहूल नाईकवाडी, नितीन तुपे, अमोल कुंभार चालक पोना धनंजय म्हेत्रे यांच्या पथकाने सोमवारी दुपारी पाचुंदा येथील ३३/११ सबस्टेशनच्या आवारात सापळा रचला़ त्यावेळी प्रदीप साठे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याची खात्री करण्यात आली़ तसेच ती रक्कम साठे यांचे सहकारी नवीनकुमार इरलावार यांच्यामार्फत स्विकारल्यानंतर पथकाने कारवाई केली़ या प्रकरणी तंत्रज्ञ प्रदीप साठे व नवीनकुमार इरलावार या दोघांविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोनि बाळासाहेब आघाव करीत आहेत़ (वार्ताहर)