एकतर्फी प्रेमातून दोन जीव संपले; जळीतकांडात तरुणानंतर ५४ दिवसांनी संशोधक तरुणीचा मृत्यू

By राम शिनगारे | Published: January 15, 2023 10:08 AM2023-01-15T10:08:56+5:302023-01-15T10:09:41+5:30

स्वत:वर आधी पेट्रोल टाकून पेटवले मग तरुणीला शोधलं; ती पळणार तेवढ्यात दरवाज बंद केला, अन् तिला मिठी मारली

Two lives ended in one-sided love; A young researcher died 54 days after the young man in the burning incident | एकतर्फी प्रेमातून दोन जीव संपले; जळीतकांडात तरुणानंतर ५४ दिवसांनी संशोधक तरुणीचा मृत्यू

एकतर्फी प्रेमातून दोन जीव संपले; जळीतकांडात तरुणानंतर ५४ दिवसांनी संशोधक तरुणीचा मृत्यू

googlenewsNext

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक तरुणाने एकतर्फी प्रेमातून स्वतःला पेटवून घेत सोबतच्या संशोधक तरुणीस मिठी मारल्याची घटना 21 नोव्हेंबर 2022 रोजी शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्थेतील बायोफिजिक्स विभागाच्या प्रयोगशाळेत घडली होती. शहराला हादरवून टाकणाऱ्या या घटनेत ९० टक्के भाजलेल्या संशोधक तरुणाचा त्याच रात्री मृत्यू झाला होता तर तब्बल 54 दिवसांनी गंभीररीत्या होरपळलेल्या तरुणीचा शनिवारी (दि. १४) रात्री बारा वाजता मृत्यू झाला.

गजानन खुशालराव मुंडे (२९, ह.मु. पीएचडी वसतिगृह, विद्यापीठ, रा. दाबा दिग्रज, ता. जिंतूर, जि. परभणी) व पूजा कडूबा साळवे (२८, ह.मु. एन ७, रा. दहेगाव, ता. सिल्लोड) अशी मृत तरुण-तरुणीची नावे आहेत. गजानन हा विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागात तर पूजा ही शासकीय विज्ञान संस्थेच्या बायोफिजिक्स विभागात पीएचडी संशोधन करत असे. दोघांचे मार्गदर्शक एकच होते.

अशी घडली होती घटना
पूजाला तिच्या एका सहकारी महिलेने विभागात बोलावून घेतले होते. तिच्यामागे गजानन हासुद्धा विभागातील प्रयोगशाळेत आला. त्याने येताच पाठीवरील बॅगमधून पेट्रोलची बाटली काढत स्वत:च्या अंगावर ओतून घेतली. काही पेट्रोल पूजाच्याही अंगावर फेकले. तेव्हा तिच्या सहकारी महिलेने तिला पळून जाण्यास सांगितले. तेवढ्यात गजानन याने प्रयोगशाळेचा दरवाजा बंद केला; तसेच त्याने लायटरने स्वत:ला पेटवून घेतले. त्याच्या अंगाने पेट घेताच त्याने पळत जाऊन पूजाला कवटाळले. पेट्रोल असल्यामुळे काही वेळातच आग सर्वत्र पसरली. पूजाने स्वत:ला त्याच्या तावडीतून सोडवून घेतले, मात्र तोपर्यंत तिचा चेहरा, डोक्याचा काही भाग जळाला होता. एकाएकी घडलेल्या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. 

चार दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यात तक्रार-
पूजाने १७ नोव्हेंबर २०२२ रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्यात बहीण व भावजी- सोबत जाऊन गजानन त्रास देत असल्याची चार पानांची तक्रार नोंदवली होती. त्यापूर्वीही तिने गजाननच्या विरोधात बेगमपुरा ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. त्याशिवाय तो छेड काढत असल्याची तक्रार काही महिन्यांपूर्वी सिडको पोलिस ठाण्यातही नोंदवली. सिडको पोलिसांनी गजाननला ठाण्यात बोलावून घेत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती.

तरुणीने फसवणुक केली; तरुणाचा दावा
जळीत तरुणाच्या मृत्यूपूर्व जबाबानुसार त्याचे तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न केले असून, २ लाख ५० हजार रुपये त्याने तिच्यावर खर्च केले होते. मात्र, काही महिन्यांपासून तरुणी हे मान्य करण्यास तयार नव्हती. तिने फसवणूक करीत माझे जीवन उद्ध्वस्त केल्यामुळे हे पाऊल उचलले असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याने जाळून घेण्यापूर्वी एक चिठ्ठीही लिहून ठेवली आहे. त्यामध्ये सर्व घटनाक्रम नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Two lives ended in one-sided love; A young researcher died 54 days after the young man in the burning incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.