औरंगाबादेत आतापर्यंत दोन अल्पसंख्याक उमेदवारांना यश; एक शायर तर दूसरा पत्रकार
By मुजीब देवणीकर | Published: April 25, 2024 06:48 PM2024-04-25T18:48:03+5:302024-04-25T18:49:47+5:30
माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले, माजी मंत्री अब्दुल अजीम यांनाही अपयश
छत्रपती संभाजीनगर : दख्खनचा प्रदेश अशी कधी काळी ओळख असलेल्या मराठवाड्याच्या राजधानीचे शहर म्हणजे औरंगाबाद होय. या जिल्ह्याने आजपर्यंत दोनच अल्पसंख्याक खासदार दिले. १९८० मध्ये विख्यात लेखक, शायर काझी सलीम काँग्रेसच्या तिकिटावर मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. त्यानंतर, अल्पसंख्याक खासदारासाठी या मतदारसंघाला तब्बल ३९ वर्षे वाट पाहावी लागली. २०१९ मध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले.
दरम्यानच्या काळात माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी १९९९ मध्ये नशीब आजमावले. त्यापूर्वी माजी मंत्री अब्दुल अजीम यांनीही काँग्रेसकडून प्रयत्न केले, पण दोन्ही नेत्यांना यश आले नाही.
१९८० मध्ये काझी सलीम
१९६२ ते १९७२ पर्यंत विधान परिषदेत नेतृत्व केलेले प्रख्यात शायर काझी सलीम यांना लोकसभेत पाठविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. १९८० मध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आली. नागरिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले सलीम यांनी एकहाती विजय मिळविला. त्यांना तब्बल १ लाख ६९ हजार ७२३, तर त्यांचे प्रतिस्पर्धी डी. एस. पाटील यांना ८५ हजार ९७५ मते पडली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा अल्पसंख्याक उमेदवार निवडून आला होता. मतदार काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत होता.
१९८४ मध्ये अल्पसंख्याक उमेदवार, पण...
१९८४ च्या लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री अब्दुल अजीम यांना काँग्रेसने संधी दिली. अजीम यांना मोठ्या मताधिक्याने पराभव पचवावा लागला. कारण शरद पवार यांच्या एस. काँग्रेसचे साहेबराव पाटील डोणगावकर मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. अजीम यांना १ लाख ५३ हजार, तर पाटील यांना तब्बल २ लाख ४६ हजार मते पडली होती.
१९८९ मध्ये मराठा कार्ड
मागील निवडणुकीचा अनुभव डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने १९८९ मध्ये मराठा उमेदवार म्हणून सुरेश पाटील यांना मैदानात उतरविले. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार मोरेश्वर सावे यांना शिवसेनेने पाठिंबा दर्शविला होता. सावे ३ लाख २२ हजार मते मिळवून विजयी झाले. सुरेश पाटील यांना ३ लाख ४ हजार मते मिळाली. कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाला शिवसेनेने सुरुंग लावला.
१९९१ पर्यंत सेनेची पाळेमुळे घट्ट
१९९१च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मोहन देशमुख यांच्यावर डाव खेळला, पण हा प्रयोगही यशस्वी झाला नाही. कारण शिवसेनेने आपली पाळेमुळे अधिक घट्ट केली होती. बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा सुरू झाला होता. या निवडणुकीतही शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मोरेश्वर सावे २ लाख ३५ हजार मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी मोहन देशमुख यांना १ लाख ४५ हजार मते मिळाली होती.
१९९९ मध्ये माजी मुख्यमंत्र्यांची एन्ट्री
मराठवाड्याच्या राजधानीतील मुस्लिम मतांची आकडेवारी लक्षात घेऊन काँग्रेसने माजी मुख्यमंत्री अब्दुल रहेमान अंतुले यांना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून लढविण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेनेही आपला उमेदवार बदलत चंद्रकांत खैरे यांना मैदानात उतरविले. अंतुले यांना ३ लाख २५ हजार मतांवर समाधान मानावे लागले.
खैरे यांनी ३ लाख ८१ हजार मते मिळवून पहिल्यांदा लोकसभेत प्रवेश केला.
२०१९ मध्ये अल्पसंख्याक खासदार
मागील दोन दशकांत काँग्रेसने अल्पसंख्याक उमेदवार देण्याची हिंमत दाखविली नाही. २०१४ मध्ये औरंगाबादेत एमआयएमची एन्ट्री झाली होती. आमदार असलेले इम्तियाज जलील यांनी लोकसभेसाठी उडी घेतली. जलील यांना ३ लाख ८९ हजार, तर त्यांचे प्रतिस्पर्धी माजी खा. चंद्रकांत खैरे यांना ३ लाख ८४ हजार मते मिळाली. ४ हजार ४९२ मतांनी जलील निवडून आले. ३९ वर्षांनंतर जलील यांनी अल्पसंख्याक खासदाराचा अनुशेष भरून काढला.