बाभूळगावला मिळाले दोन आमदार
By Admin | Published: October 21, 2014 01:47 PM2014-10-21T13:47:29+5:302014-10-21T13:47:29+5:30
हिंगोली तालुक्यातील बाभूळगाव या गावाला मागील सहा महिन्यांत दोन आमदार मिळाले आहेत. यापूर्वी या गावचे दगडू गलंडे हे आमदार झाले होते.
हिंगोली : तालुक्यातील बाभूळगाव या गावाला मागील सहा महिन्यांत दोन आमदार मिळाले आहेत. यापूर्वी या गावचे दगडू गलंडे हे आमदार झाले होते.
बाभूळगाव हे गाव गलंडे यांच्यामुळे राजकीय क्षेत्राच्या नकाशावर आले होते. जनता दलाच्या काळात गलंडे हे आमदार झाले. मात्र नाकासमोर चालण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे व नंतर राजकारणात बदलत चाललेल्या बाबींनी त्यांना पुन्हा संधी दिली नाही.
त्यानंतर अनेक वर्षे हे गाव राजकीयदृष्ट्या बाजूलाच पडलेले होते. बाभूळगाव येथीलच मूळ रहिवासी असलेले रामराव वडकुते यांनी कळमनुरी मतदारसंघात यापूर्वी प्रयत्न केला होता. मात्र ते अपयशी ठरले. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसवरच त्यांनी ठेवलेल्या निष्ठेचे फळ म्हणून त्यांना विधान परिषदेवर संधी पक्षाने बहाल केली. त्यामुळे लोकांतून निवडून येण्याऐवजी थेटच त्यांच्या पदरात पक्षाने माप टाकले. त्यानंतर मागच्या वेळी कळमनुरी मतदारसंघात पुन्हा याच गावचे डॉ.संतोष टारफे हे बसपाकडून उभे होते. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. यावेळी त्यांनी पुन्हा कॉंग्रेसकडून नशीब आजमावले आणि ते यशस्वी झाले. त्यामुळे बाभूळगावला त्यांच्या रुपाने तिसर्यांदा आमदार पद मिळाले. आता या गावाचे एक माजी तर दोन विद्यमान आमदार आहेत.
--------
गोरेगावकडे पाचवेळा राहिले आमदारपद
गोरेगावचा विक्रम मात्र नजीकच्या काळातही कोणी मोडेल, असे दिसत नाही. या एकाच गावाने आत्तापर्यंत तब्बल पाच आमदार दिले आहेत. त्यात बाबूराव पाटील गोरेगावकर, नारायण पाटील गोरेगावकर, चंद्रकांत पाटील गोरेगावकर, साहेबराव पाटील गोरेगावकर व नुकतेच पराभूत झालेले भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा समावेश आहे.