उद्याच्या शटडाऊननंतर दोन एमएलडी पाणी वाढणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 05:52 PM2018-10-25T17:52:11+5:302018-10-25T17:54:51+5:30

शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जायकवाडीत वीज वितरण कंपनी दुरुस्तीचे काम करणार आहे.

Two MLD water will increase after tomorrow's shutdown | उद्याच्या शटडाऊननंतर दोन एमएलडी पाणी वाढणार 

उद्याच्या शटडाऊननंतर दोन एमएलडी पाणी वाढणार 

googlenewsNext
ठळक मुद्देशुक्रवारी मनपाच्या पाणीपुरवठ्याचा खंडणकाळ नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे महापालिकेचे आवाहन

औरंगाबाद : शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जायकवाडीत वीज वितरण कंपनी दुरुस्तीचे काम करणार आहे. याच कालावधीत महापालिका तीन ठिकाणी असणारी पाणीगळती थांबविणार आहे. फारोळा, नक्षत्रवाडी आणि ढोरकीन येथेही पंपगृहाची कामे युद्धपातळीवर करण्यात येणार आहेत. या कामांमुळे शहराच्या पाण्यात किमान दोन एमएलडीने वाढ होणार आहे. याशिवाय काही अंशी पाणीवितरणही (डिस्चार्ज) वाढणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे महापौर नंदकुमार घोडेले यांना देण्यात आली.

बुधवारी दुपारी महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. शुक्रवारी खंडणकाळात वीज कंपनी, मनपातर्फे कोणकोणती कामे करण्यात येणार आहेत, याचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता हेमंत  कोल्हे यांनी नमूद केले की, मागील सहा महिन्यांपासून महावितरण कंपनीला शटडाऊन पाहिजे होते. दसरा आणि दिवाळीच्या मध्ये खंडणकाळाला आयुक्तांनी मंजुरी दिली. अवघ्या सहा तासांमध्ये महापालिका आणि महावितरण कंपनी संपूर्ण ताकदीने विविध दुरुस्तीची कामे करणार आहे. शुक्रवार आणि शनिवारी औरंगाबादकरांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. नागरिकांनी सध्या असलेले पाणी फेकून न देता जपून ठेवावे, असे आवाहनही मनपातर्फे करण्यात आले आहे.

मनपातर्फे होणारी मोठी कामे
ढोरकीन येथे दोन ठिकाणी जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येईल. ढाकेफळ येथे काही व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात येणार आहे. ढोरकीन येथे पाण्याची गळती थांबविण्यात येणार आहे. आर.एल. स्टीलजवळ मोठा व्हॉल्व्ह दुरुस्त करण्यात येईल. अजित सीडस्जवळही एक मोठी दुरुस्ती आहे.

दुरुस्तीचे फायदे काय
जायकवाडीत वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. भविष्यात हा त्रास कमी होईल. धरणातून पाणी ओढण्याची क्षमता पूर्वीच्या तुलनेत वाढणार आहे. दोन एमएलडी पाण्याची वाढ विविध कामे झाल्यावर अपेक्षित आहे. जायकवाडी, फारोळा, नक्षत्रवाडी, ढोरकीन येथे पंपगृहांसह छोटी-मोठी कामे करण्यात येतील.

उपाययोजना करा
शुक्रवारी शहरात अजिबात पाणीपुरवठा होणार नाही. शहरात महापालिकेच्या मालकीचे ७९ टँकर आहेत. हे सर्व टँकर आणीबाणीच्या परिस्थितीसाठी म्हणून भरून ठेवण्यात यावेत, अशी सूचना महापौर घोडेले यांनी केली. शहरातील काही पाण्याच्या टाक्यांमध्ये आणीबाणी म्हणून पाणी साठवून ठेवावे. मागणी खूपच वाढल्यास या टाक्यांमधील पाणी टँकरने द्यावे.

Web Title: Two MLD water will increase after tomorrow's shutdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.