बनावट आधारकार्डआधारे फायनान्स कंपनीकडून खरेदी केले दोन मोबाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:27 PM2018-11-24T23:27:20+5:302018-11-24T23:27:38+5:30
बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या आधारे फायनान्स कंपनीकडून दोन मोबाईल खरेदी करून २३ हजार ४२२ रुपयांची फसवणूक के ल्याचे समोर आले. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध सिटीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
औरंगाबाद : बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या आधारे फायनान्स कंपनीकडून दोन मोबाईल खरेदी करून २३ हजार ४२२ रुपयांची फसवणूक के ल्याचे समोर आले. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध सिटीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
साजेद खान निसार खान (रा. शहाबाजार, काचीवाडा) आणि शेख रेहान शेख खालीद शेख (रा. शहाबाजार), असे गुन्हा नोंद झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपींनी संगनमत करून जुनाबाजार आणि कॅनॉट प्लेस येथे मोबाईल शॉपीतून दोन मोबाईल खरेदी केले होते. त्यांनी मोबाईल खरेदीसाठी गारखेडा परिसरातील रहिवासी राजेंद्र होनाजी इंगोले यांच्या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले. मोबाईल खरेदीनंतर साजेद आणि रेहान यांनी कर्ज परतफेडीचे केवळ दोनच हप्ते भरले. त्यानंतर त्यांनी हप्ते भरणे बंद केले. ही बाब कंपनीच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी साजेद आणि रेहान यांनी कर्ज घेताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली तेव्हा त्यांनी एकाच व्यक्तीच्या आधारकार्ड आणि पॅनकार्डमध्ये फेरफार करून कर्ज घेतल्याचे समोर आले. आरोपींनी कट रचून आणि बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवून कंपनीची २३ हजार ४३३ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार इंगोले यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बांगर तपास करीत आहेत.