सिमेंट रस्त्यांना दोन महिन्यांची डेडलाईन

By Admin | Published: July 22, 2016 12:08 AM2016-07-22T00:08:02+5:302016-07-22T00:47:03+5:30

औरंगाबाद : चोवीस कोटींच्या निधीतील व्हाईट टॅपिंगच्या अर्धवट रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

Two month deadline for cement roads | सिमेंट रस्त्यांना दोन महिन्यांची डेडलाईन

सिमेंट रस्त्यांना दोन महिन्यांची डेडलाईन

googlenewsNext

औरंगाबाद : चोवीस कोटींच्या निधीतील व्हाईट टॅपिंगच्या अर्धवट रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. तसेच क्रांतीचौक ते महावीर चौक या पाचव्या नियोजित रस्त्याऐवजी लक्ष्मण चावडी ते एमजीएम या रस्त्याचे काम करण्याचा निर्णयही विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतला आहे.
राज्य सरकारने रस्त्यांच्या कामांसाठी गतवर्षी महानगरपालिकेला २४ कोटी ३३ लाख रुपयांचा विशेष निधी दिला होता. रस्त्यांची ही कामे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या देखरेखीखाली करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार समितीने पाच रस्ते व्हाईट टॅपिंगचे करण्याचा निर्णय घेऊन निविदा प्रक्रिया राबविली. त्यानंतर सेव्हन हिल ते सूतगिरणी चौक, गजानन महाराज मंदिर चौक ते जयभवानीनगर, संत तुकोबानगर ते कासलीवाल कॉर्नर आणि कामगार चौक ते महालक्ष्मी कॉलनी, या चार रस्त्यांची कामेही सुरू झाली. मात्र वर्ष उलटले तरी या चार रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. या पार्श्वभूमीवर बुधवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक झाली.
बैठकीला जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांसह इतर अधिकारी उपस्थित होते. यामध्ये रस्त्यांची कामांची सद्य:स्थिती, त्यातील अडथळे आदींवर चर्चा झाली. त्यानंतर ही चारही कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला दोन महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच क्रांतीचौक ते महावीर चौक या रस्त्याऐवजी लक्ष्मण चावडी ते एमजीएम या रस्त्याचे काम करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे आता बऱ्याच दिवसांपासून रखडलेला हा रस्ता व्हाईट टॅपिंगचा होणार आहे.
पाचव्या रस्त्याचे नव्याने टेंडर
याआधी एकच निविदा काढून पाचही रस्त्यांची कामे एकाच एजन्सीला दिली होती. मात्र, आता पाचव्या रस्त्याच्या कामात बदल झाल्यामुळे त्यासाठी नव्याने निविदा काढण्यात येणार आहे.
काही ठिकाणी ड्रेनेजलाईन स्थलांतरित करण्याच्या कारणामुळे रस्त्यांच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. ही बाब विचारात घेऊन अपूर्ण रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी आणखी दोन महिन्यांची वेळ देण्यात आली आहे. शिवाय पाचव्या रस्त्यासाठीही निविदा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- उमाकांत दांगट, विभागीय आयुक्त
पर्यटनस्थळांजवळ माहिती फलक, रस्त्यांवर साईन बोर्ड
चोवीस कोटींच्या निधीपैकी पाच टक्के निधी रोड फर्निचरसाठी वापरण्याचे आदेश विभागीय आयुक्त दांगट यांनी दिले आहेत. त्यानुसार आता शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी साईन बोर्ड लावले जाणार आहेत. यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांना कोणते ठिकाण कुठे आहे हे समजण्यास मदत मिळेल. शिवाय ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी माहिती फलकही लावण्यात येणार आहेत. या सर्वांवर साधारण १ कोटी २० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
शहरवासीयांची गैरसोय
व्हाईट टॅपिंगच्या रस्त्यांचे काम रखडल्यामुळे शहरवासीयांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गजानन महाराज मंदिर ते जयभवानीनगर रस्ता चार महिन्यांपासून खोदून ठेवला आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून ये- जा करणाऱ्या खड्ड्यांबरोबरच आधी धुळीचा आणि आता पावसाळ्यात चिखलाचा त्रास होतो आहे. याचप्रमाणे गजानन महाराज मंदिर चौकातून सूतगिरणीकडे जाणारा रस्ताही काही ठिकाणी खोदून ठेवण्यात आला.

Web Title: Two month deadline for cement roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.