पगारिया शोरूम फोडणाऱ्या आणखी दोघांना बेड्या; तिघांचा परराज्यात शोध
By राम शिनगारे | Published: September 28, 2022 06:25 PM2022-09-28T18:25:14+5:302022-09-28T18:25:52+5:30
पोलिसांनी साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आला आहे
औरंगाबाद : शहरातील मुख्य रस्त्यावरील पगारिया शोरूम फोडून दोन तिजोरीतील १५ लाख ४३ हजार २४७ रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या आणखी दोन आरोपींना क्रांतीचौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधिशांनी दोघांना १ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजुरी केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी दिली.
जालना रोडवरील जिल्हा न्यायालयाच्या समोर असलेल्या पगारिया शोरूमवर ३ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर दरोडा टाकून आठ जणांनी दाेन तिजोऱ्या पळवून नेल्या होत्या. पळविलेल्या तिजोऱ्या तिसगाव शिवारात फोडून त्यातील पैसे घेत चोरट्यांनी पोबारा केला. या गुन्ह्यात क्रांतीचौक पोलिसांसह गुन्हे शाखा समांतर तपास करीत होती. गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील तीन आरोपींना २१ सप्टेंबर रोजी बेड्या ठोकल्या होत्या. त्याचवेळी इतर साथीदारांची नावे समोर आली होती. या टोळीने महाराष्ट्र, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात शोरूम लुटण्याचे कारनामे केल्याचे उघड झाले होते.
क्रांतीचौक पोलिसांच्या विशेष पथकाचे उपनिरीक्षक विकास खटके, हवालदार संतोष मुदीराज, इरफान खान, नरेंद्र गुजर, भाऊलाल चव्हाण, संतोष सूर्यवंशी, हनुमंत चाळणेवाड आणि कृष्णा चौधरी यांनी गुन्ह्यातील आणखी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यात जितु मंगलसिंग बेलदार (२५) आणि अभिषेक देवराम मोहीते (१९, दोघे रा. धानोरी, ता. बोदवड, जि. जळगाव) या आरोपींचा समावेश आहे. या आरोपींकडून ३० हजार रुपये राेख रक्कमही जप्त केली आहे. या चोरीच्या गुन्ह्यात आतापर्यंत ४ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असल्याचे निरीक्षक डॉ. दराडे यांनी सांगितले.
तीन आरोपी परराज्यात
पगारिया शोरूम फोडणाऱ्या आठ आरोपींपैकी पाच जणांना आतापर्यंत बेड्या ठोकल्या आहेत. उर्वरित तीन आरोपी परराज्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उर्वरित आरोपींच्या मागावर पोलीस आहेत.