आणखी दोघांना पोलिसांनी केली अटक
By Admin | Published: August 25, 2016 11:45 PM2016-08-25T23:45:25+5:302016-08-25T23:46:11+5:30
परभणी : येथील पुरवठा विभागाच्या तीन गोदामांमधील ४ कोटी ९५ लाख रुपयांचे १९ हजार १४१ क्विंटल धान्य गायब झाल्या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली
परभणी : येथील पुरवठा विभागाच्या तीन गोदामांमधील ४ कोटी ९५ लाख रुपयांचे १९ हजार १४१ क्विंटल धान्य गायब झाल्या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली असून, त्यांना गुरुवारी परभणी येथील न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने ३१ आॅगस्टपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे़
परभणी येथील पुरवठा विभागाच्या तीन गोदामांमधून ४ कोटी ९५ लाख रुपयांचे धान्य गायब झाल्या प्रकरणात जिल्हा पुरवठा अधिकारी दिलीप कच्छवे यांच्या फिर्यादीवरून गोदामपाल अनिल आंबेराव व मुकादम शेख महेबुब या दोघांवर यापूर्वी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, हे आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत़ या प्रकरणात तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्याकडून कसून व योग्य पद्धतीने तपास सुरू आहे़ पोलिस कोठडीतील आरोपींकडून केलेल्या चौकशीत पोलिसांच्या हाती दोन महत्त्वपूर्ण नावे लागली़ त्यानुसार पोलिसांनी रेशन दुकानदार वसंत देसाईराव देशमुख (रा़ लोहगाव) व पवन लक्ष्मणराव बनसोडे (रा़परभणी) या दोन आरोपींना बुधवारी मध्यरात्री त्यांच्या घरून अटक केली़ या दोन्ही आरोपींनी गायब झालेल्या धान्यातील जवळपास २ हजार क्विंटल धान्य विकल्याची पोलिसांची माहिती आहे़ दोन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने त्यांना ३१ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे़ या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या आता ४ झाली असून, दिवसेंदिवस आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे़ रेशनचे धान्य ज्या वाहनांमधून नेण्यात आले, ती वाहने, वाहनांचे मालक, चालक आदी सर्वच या चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकणार आहेत़ याशिवाय रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्यांचीही आता भंबेरी उडाली असून, ते ही पोलिसांच्या रडारावर आहेत़ त्यामुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे़ (जिल्हा प्रतिनिधी)
दोन आरोपींची पोलिस कोठडी आज संपणार
पोेलिसांनी अटक केलेले आरोपी अनिल आंबेराव व शेख महेबुब यांची पोलिस कोठडी २६ आॅगस्ट रोजी संपणार आहे़ त्यामुळे पोलिस पुढील पोलिस कोठडी वाढवून मिळावी, यासाठी त्यांना शुक्रवारीही न्यायालयासमोर उभे करणार आहेत़
दोन्ही कार्यालयांनी जमा केले रेकॉर्ड
जिल्हा पुरवठा अधिकारी व परभणी तहसील या दोन्ही कार्यालयांना दोन वेळा पोलिसांनी गोदामांशी संबंधित रेकॉर्ड मागूनही ते मिळाले नव्हते़ याबाबत ‘लोकमत’ने गुरुवारी वृत्त प्रसिद्ध करताच दोन्ही कार्यालयातील कर्मचारी कोतवाली पोलिस ठाण्यात सर्व रेकॉर्ड घेऊन दाखल झाले़ आता उपलब्ध झालेल्या कागदपत्रांची पोलिसांकडून बारकाईने तपासणी केली जाणार आहे़ या तपासणीच्या आधारे कशी अनियमितता झाली? अनियमिततेमध्ये कोण कोण होते? या बाबतची माहिती मिळविली जाणार आहे़
‘लोकमत’च्या वृत्तानंतर तहसील व पुरवठा अधिकारी कार्यालयातून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे पोलिसांकडे जमा करण्यात आली आहेत़ या प्रकरणात पोलिसांकडे दोन गोण्या कागदपत्रे जमा झाली आहेत़