चोरीच्या रिक्षासह दोन मोटारसायकल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:04 AM2021-06-22T04:04:27+5:302021-06-22T04:04:27+5:30
औरंगाबाद : चाेरीची रिक्षा विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असलेल्या दोन चोरांना सिडको ठाण्यातील गुन्हेशोध पथकाने रविवारी अटक केली. आरोपींकडून ...
औरंगाबाद : चाेरीची रिक्षा विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असलेल्या दोन चोरांना सिडको ठाण्यातील गुन्हेशोध पथकाने रविवारी अटक केली. आरोपींकडून चोरीच्या रिक्षासह दोन मोटारसायकली जप्त केल्या. प्रदीप लक्ष्मण शेळके (वय ३५, रा. भराडी, ता. सिल्लोड), आणि विनोद नारायण त्रिभुवन (३०, रा. मिसारवाडी) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत.
सिडको पोलिसांनी सांगितले की, सिडको एन-६ येथून तीन ते चार दिवसांपूर्वी एक रिक्षा चोरीला गेली होती. याविषयी सिडको ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. या घटनेसह दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सिडको ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके, हवालदार सुभाष शेवाळे, गणेश नागरे, सुरेश भिसे, विशाल सोनवणे, स्वप्निल रत्नपारखी हे रविवारी गस्तीवर होते. यावेळी मिसारवाडीतील एका गल्लीत दोन चोरटे रिक्षात बसल्याची माहिती खबऱ्याने पथकाला दिली. यानंतर पथकाने तेथे जाऊन दोन्ही संशयितांना पकडले. यावेळी त्यांना रिक्षाच्या मालकी हक्काविषयी विचारपूस करताच ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसांचा संशय बळावताच पोलिसांनी त्यांना ठाण्यात नेऊन त्यांची कसून चौकशी केली. तेव्हा आरोपींनी तीन ते चार दिवसांपूर्वी सिडको एन ६ येथून ही रिक्षा चोरल्याची कबुली दिली. त्यांना खाक्या दाखविताच त्यांनी सिडकोतील एका दारू दुकानाजवळून एक, तर दुसरी मोटारसायकल एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल पंपाजवळून चोरल्याचे सांगितले. चोरलेल्या दोन दुचाकी लपवून ठेवलेल्या दाखविल्या. पोलिसांनी या दोन्ही दुचाकी जप्त केल्या. या दोन्ही मोटारसायकल आणि रिक्षा जप्त केली.
=====================--------------------------------------------------------
चौकट
पोलीस रेकॉर्डवरील आरोपी
आरोपी त्रिभुवन हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल चोर आहे. या चोरट्यांकडून वाहन चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.