गंगापूरमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 04:16 PM2023-07-04T16:16:55+5:302023-07-04T16:17:37+5:30

मयत जालना जिल्ह्यातील रहिवासी; अपघातानंतर ट्रक चालक फरार

Two on two-wheeler killed in truck collision in Gangapur; One seriously injured | गंगापूरमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

गंगापूरमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

googlenewsNext

गंगापूर (जि. छ. संभाजीनगर) : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शहराजवळील वैजापूर मार्गावर एका पेट्रोल पंपासमोर मंगळवारी (दि. ४) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. राजेश प्रताप पटेकर (वय २४, रा. मोतीगव्हाण, ता. जालना) व विशाल रावसाहेब हिवाळे (वय २३, रा. हतवन, ता. जालना) अशी मयतांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, मूळ जालना जिल्ह्यातील रहिवासी व सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात वास्तव्यास असलेले राजेश प्रताप पटेकर, विशाल रावसाहेब हिवाळे, ज्ञानेश्वर सातपुते हे तीन तरुण मंगळवारी पहाटे तीन वाजता दुचाकीवर (एमएच २१-बीआय ५०५८) छत्रपती संभाजीनगरहून गंगापूर मार्गे वैजापूरकडे जात असताना वैजापूरहून गंगापूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने (क्र. केए ५६-५२७८) दुचाकीला एका पेट्रोल पंपासमोर जोराची धडक दिली. त्यानंतर ट्रक चालक वाहनासह पळून गेला. घटना स्थळाच्या परिसरातील हॉटेल चालकाने पोउनि शकील शेख यांना अपघाताची माहिती देताच शेख रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ, अमर राजपूत, श्री साबणे यांना घेऊन तत्काळ अपघातस्थळी दाखल झाले. 

डोक्याला मार लागल्याने राजेश प्रताप पटेकर व विशाल रावसाहेब हिवाळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा तिसरा सहकारी ज्ञानेश्वर सातपुते हा या अपघात गंभीर जखमी झाला. त्यास येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठविले. अपघातातील मृत राजेश, विशाल हे दोघे व जखमी ज्ञानेश्वर हे तिघे खासगी नोकरी करीत होते, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. जखमी ज्ञानेश्वर शुद्धीवर नसल्याने हे तिघे रात्री एवढ्या उशिरा नेमके कोठे व कशासाठी जात होते, हे समजू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा
मंगळवारी सकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा होता. दोघांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले. मृत राजेश पटेकर याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, तर विशाल हिवाळे याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या घटनेचा अधिक तपास पोउनि शकील शेख करीत आहेत.

Web Title: Two on two-wheeler killed in truck collision in Gangapur; One seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.