प्रेमप्रकरणातून तरुणाचे अपहरण करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 19:26 IST2018-10-01T18:33:50+5:302018-10-01T19:26:40+5:30
प्रेमप्रकरणातून मित्रांचे कारमधून अपहरण करून नेणाऱ्या दोन जणांना उस्मानपुरा पोलिसांनी अटक करून अपहत तरूणाची मुक्तता केली.

प्रेमप्रकरणातून तरुणाचे अपहरण करणाऱ्या दोघांना अटक
औरंगाबाद : प्रेमप्रकरणातून मित्रांचे कारमधून अपहरण करून नेणाऱ्या दोन जणांना उस्मानपुरा पोलिसांनी अटक करून अपहत तरूणाची मुक्तता केली. हे अपहरण आज १ आॅक्टोबर रोजी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास उस्मानपुरा येथील गोपाल टी जवळ घडले. अमोल दिलीप अंभोरे (वय २६,रा. भगतसिंगनगर, मयुरपार्क) आणि सागर विष्णू खंडागळे (वय २४,रा. सातारा परिसर)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. भावेश संजय सोनवणे (वय २२) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याविषयी अधिक माहिती देताना उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार अक्षय परमानंद मेहता याने या अपहरणाची उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार, भावेशला अमोल आणि विष्णू यांनी आज सकाळी क्रांती चौकात भेटण्यास बोलावले होते. यावर भावेश अक्षयला सोबत घेऊन क्रांती चौकात गेला. येथे अमोल आणि विष्णू आले असता त्यांनी भावेशाकडून त्याचा मोबाईल घेतला. अमोलने भावेश आणि त्याच्या माजी प्रेयसीची चॅटींग मोबाईलमध्ये पाहिली. ती सर्व चॅटींग डिलीट करत त्याने अक्षयला तिथेच थांबवत भावेशला कारमध्ये बसवून तेथून अज्ञातस्थळी नेले.
या प्रकारानंतर अक्षयने भावेशला फोन लावला असता तो बंद असल्याचे कळले. यामुळे अक्षयने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी झटपट कारवाई करून अपहरणकर्त्यांना निरालाबाजार येथे पकडले. आरोपींच्या ताब्यातून भावेशची मुक्तता करून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे.