नायब तहसीलदाराकडून खंडणी उकळणारे दोन जण गुन्हे शाखेच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 06:51 PM2019-02-01T18:51:42+5:302019-02-01T18:53:55+5:30
खंडणी उकळणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले.
औरंगाबाद : तलाठीपदी कार्यरत असताना अनियमितता केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करून परभणी येथे कार्यरत नायब तहसीलदाराला धमकावत ५० हजार रुपये खंडणी उकळणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले. आरोपींपैकी एक जण आॅल इंडिया बंजारा टायगर्स संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे.
प्रेमदास तुकाराम चव्हाण आणि नंदू बाळा चव्हाण अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे म्हणाले की, हरिशचंद्र रंगनाथ सोनवणे (रा. आदित्यनगर, हर्सूल परिसर) हे सध्या परभणी येथे नायब तहसीलदार आहेत. २००४ ते २००८ या कालावधीत सोनवणे हे जटवाडा सज्जा येथे तलाठी होते. तेव्हा त्यांनी कार्यालयीन कामात उणिवा असल्याचे भासवून आॅल इंडिया बंजारा टायगर संघटनेचा संस्थापक अध्यक्ष अशोक आर. राठोड यांच्याशी संगनमत करून जिल्हाध्यक्ष प्रेमदास चव्हाण आणि नंदू चव्हाण यांनी सोनवणेविरोधात मंत्रालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी केल्या होत्या. याबाबतचे छायाचित्रे ते सोनवणे यांना पाठवून यापुढे तक्रारी न करण्यासाठी खंडणीची मागणी करीत होते.
आरोपींकडून होत असलेल्या ब्लॅकमेलिंगला त्रस्त झालेले सोनवणे यांनी याविषयी गुन्हेशाखेकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आज पुन्हा आरोपींचा खंडणीसाठी फोन आला. याबाबतची माहिती सोनवणे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी खंडणीखोरांना पकडण्यासाठी दोन पंचांसमक्ष सोनवणे यांच्या घरी सापळा रचला. त्याचवेळी आरोपींनी पुन्हा खंडणीसाठी फोन केला तेव्हा सोनवणे यांनी त्यांना पैसे घेण्यासाठी घरी बोलावले.
३१ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आरोपी प्रेमदास तुकाराम चव्हाण आणि नंदू बाळा चव्हाण यांनी पंचांसमक्ष सोनवणे यांच्याकडून खंडणीचे पन्नास हजार रुपये घेतले. त्यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी प्रेमदास आणि नंदूला खंडणीच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून दोन मोबाईल आणि इतर वस्तू असा सुमारे १ लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद,उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख, कर्मचारी नंदकुमार भंडारे, विकास माताडे, नवाब शेख, विलास वाघ, वीरेश बने, संजयसिंह राजपूत, धर्मराज गायकवाड यांनी केली.