औरंगाबादेत बनावट आधार कार्ड बनवून देणारे दोन जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 01:45 PM2019-01-01T13:45:27+5:302019-01-01T13:49:38+5:30
आधार कार्डच्या स्कॅनिंगमुळे हा प्रकार उघडकीस आला.
वाळूज महानगर (औरंगाबाद ) : आधार कार्डसह शासनाच्या विविध रोजगार योजनांचे मानधन सुरू करून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या महिलेसह दोघांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. आधार कार्डच्या स्कॅनिंगमुळे हा प्रकार उघडकीस आला.
छाया उगले (३२) व सुनील दादाराव उगले (४०, रा. क्रांतीनगर गल्ली नं. ३, औरंगाबाद) हे दोघे मिळून एक ते दीड महिन्यापासून बजाजनगर, म्हाडा कॉलनी, तीसगाव, गोलवाडी, सिडको आदी परिसरात आधार कार्ड, बसचे अर्धे तिकीट काढून देतो. तसेच अपंग, मूकबधिर, रोहयोसह इतर कामगार योजनांचे मानधन सुरू करून देण्याचे आमिष दाखवत पैसे जमा केले. आधार कार्ड व बसचे अर्ध्या तिकिटाच्या नावाखाली प्रत्येकी ३०० रुपये, तर योजनांचे मानधनासाठी प्रत्येकी १ हजार रुपये जमा केले.
सुनील उगले हा छाया हिला गावात सोडून परत घ्यायला यायचा. छाया दुपारच्या वेळी महिलांना गाठून त्यांना शासनाच्या योजनांची माहिती पटवून द्यायची व अनेकांना मानधन सुरू करून दिल्याचे सांगायची. ते ग्रामस्थांकडून फॉर्मही भरून घेत. यात तीसगावातील ५० पेक्षा अधिक नागरिक आहेत. पोलिसांनी छाया उगलेसह सुनीलला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अशी झाली बनवेगिरी उघड
छाया उगले हिने तीसगावातील काही नागरिकांना नवीन आधार कार्ड काढून दिले. जगदीश शेलारे यांनी हे आधार कार्ड आधारच्या अॅपवर स्कॅन करून पाहिले असता त्यावर नाव दुसऱ्याचे तर पत्ता नाशिकचा आला. शेलार यांनी असे पाच ते सहा आधार कार्ड स्कॅन करून पाहिले असता सर्वच आधार कार्डवर नाव आणि पत्ता सारखाच दिसून आला. सोमवारी दुपारी छाया उगले पैसे जमा करण्यासाठी तीसगाव येथे आली असता तिला बनावट आधार कार्ड विषयी विचारणा केली. यावर तिला काहीच सांगता आले नाही. त्यानंतर छाया हिने सुनील उगले याला बोलावून घेतले. नागरिकांनी दोघांनाही पकडून वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.