तीन जिनिंगसह दारू दुकाने फोडणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोन जणांना ग्रामीण पोलिसांकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:25 AM2019-07-09T00:25:56+5:302019-07-09T00:26:17+5:30
डोंगरगाव शिवारातील तीन जिनिंगचे कार्यालय ३ जुलैच्या रात्री फोडून १३ लाख ६९ हजार ९९४ रुपये आणि ३०० अमेरिकन डॉलर चोरून नेणाºया आंतरजिल्हा टोळीतील दोघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने शनिवारी जालना येथे अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यात वापरलेल्या चोरीच्या दोन जीप, दारूसाठा, धारदार शस्त्रे आणि रोख रक्कम असा सुमारे १३ लाख ८० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
औरंगाबाद : डोंगरगाव शिवारातील तीन जिनिंगचे कार्यालय ३ जुलैच्या रात्री फोडून १३ लाख ६९ हजार ९९४ रुपये आणि ३०० अमेरिकन डॉलर चोरून नेणाºया आंतरजिल्हा टोळीतील दोघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने शनिवारी जालना येथे अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यात वापरलेल्या चोरीच्या दोन जीप, दारूसाठा, धारदार शस्त्रे आणि रोख रक्कम असा सुमारे १३ लाख ८० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
तेजासिंग नरसिंग बावरी (२२,रा. मंगलबाजार, जालना) आणि तकदीरसिंग टिटूसिंग टाक (रा. देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ३ जुलैच्या रात्री डोंगरगाव शिवारातील हरिओम कॉटन जिनिंगचे कार्यालय फोडून चोरट्यांनी १३ लाख ६९ हजार ९९४ रुपये आणि ३०० अमेरिकन डॉलर पळविले होते. तेथील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरही चोरटे सोबत घेऊन गेले होते. याविषयी सिल्लोड ठाण्यात रोहित संतोष अग्रवाल यांनी फिर्याद नोंदविली होती. ही चोरी जालना शहरातील तेजासिंग बावरी व साथीदाराने केल्याची माहिती स्थानिक गुन्हेशाखेला खबºयाने दिली. त्यावरून जालन्यातील रामनगरमधील एका हॉटेलसमोर तेजासिंगला पोलिसांनी पकडले. चौकशीअंती त्याने गुन्ह्याची कबुली देत तकदीरसिंग आणि अन्य साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी लगेच तकदीरसिंगला पकडले. त्याचे अन्य साथीदार मात्र पसार आहेत. आरोपींकडून दोन जीपसह, रोकड आणि गुन्हा करताना वापरलेले साहित्य जप्त केले.
विविध ठिकाणचे बीअरबार, दारूची दुकाने फोडली
या आंतरजिल्हा टोळीने फुलंब्री, करमाड, सिल्लोड,भोकरदन, बुलडाणा आणि जालना जिल्ह्यातील विविध देशी दारूची दुकाने आणि बीअरबार फोडून दारू चोरल्याची कबुली दिली. चोरलेली दारू त्यांनी जालना येथील हॉटेलचालक प्रशांत जगताप आणि सोन्यासिंग प्रेमसिंग टाक यांना विक्री केल्याचे सांगितले. शिवाय हे गुन्हे करण्यासाठी ते वाहनही चोरून नेत. चोरलेल्या दोन जीपचे मागील सीट काढून ते दारू नेत असत.
पथकाला १५ हजार रुपयांचे बक्षीस
अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत, उपनिरीक्षक संदीप सोळुंके, कर्मचारी गफ्फार पठाण, सय्यद झिया, गणेश मुळे, नवनाथ कोल्हे, विक्रम देशमुख, नामदेव सिरसाट, शेख नदीम, गणेश गांगवे, बाबासाहेब कोल्हे, ज्ञानेश्वर मेटे, संजय तांदळे, योगेश तरमाळे,जीवन घोलप यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल १५ हजार रुपये बक्षीस अधीक्षकांनी जाहीर केले.ग्रामीण पोलिसांनी पकडलेल्या आरोपीवर ३६ गुन्ह्यांचा डोंगर
आरोपी तेजासिंग बावरी हा जालन्यासह परभणी, बीड, अंबाजोगाई पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. तेजासिंग हा बालपणापासून गुन्हे करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. वयाच्या बाविसाव्या वर्षी त्याच्यावर विविध ठिकाणी तब्बल ३६ गुन्ह्यांची नोंद आहे. यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, दरोड्याची तयारी करणे, खुनाचा प्रयत्न करणे आणि शस्त्र बाळगणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे आदी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.