दोन पोलिसांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल
By Admin | Published: March 26, 2017 10:54 PM2017-03-26T22:54:16+5:302017-03-26T23:00:26+5:30
अंबाजोगाई : एका लॉटरी सेंटरमधे धुडगूस घालत गल्ल्यातील रक्कम घेतल्याच्या आरोपावरून दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अंबाजोगाई : एका लॉटरी सेंटरमधे धुडगूस घालत गल्ल्यातील रक्कम घेतल्याच्या आरोपावरून दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना शनिवारी रात्री शहरातील नगर पालिकेच्या उद्यानाशेजारी घडली.
नगर परिषदेच्या उद्यानासमोरील गाळ्यात सय्यद अन्सार सय्यद अजगर यांच्या मालकीचे आर. के. लॉटरी सेंटर आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी रात्री ८.३० वाजता ते आणि त्यांचा मेहुणा शेख इम्रान शेख खालेद दुकानात बसले होते. यावेळी अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याचे शिपाई अनंत मारोती इंगळे आणि परळी ग्रामीण ठाण्याचे शिपाई जाधव (पूर्ण नाव नाही) हे दोघे लॉटरी सेंटरमधे आले आणि पैशांची मागणी करू लागले. अन्सार यांनी नकार देताच इंगळे याने सय्यद यांना दुकानाबाहेर ओढले. आम्हाला पैसे दे म्हणत दिवसभरात जमलेला लॉटरीचा गल्ल्यामधील १५ ते १६ हजाराची रोख रक्कम बळजबरीने काढून घेत ती सोबत असलेले जाधव याच्याकडे दिली. 'मी याची बघून घेतो' असे म्हणत इंगळे याने जाधव यास तिथून जाण्यास सांगितले. अन्सार यांना सोडविण्यास आलेला त्यांचा मेहुणा शेख इम्रान यासही इंगळे याने ढकलून दिले. यावेळी तिथे जमाव जमला आणि त्यांनी इंगळे यांना धरून ठेवले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी सय्यद अन्सार यांच्या तक्रारीवरून पोलीस शिपाई अनंत मारोती इंगळे आणि जाधव या दोघांवर कलम ३९२, ३४ अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अनंत इंगळे यास ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख हे करीत आहेत. या घटनेने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)