औरंगाबादेत दोन कैद्यांचा मृत्यू; मृतात कोठेवाडी प्रकरणातील कैद्याचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 02:17 PM2022-01-17T14:17:39+5:302022-01-17T14:23:44+5:30
एकाचा हृदयविकाराने तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
औरंगाबाद : कोठेवाडी प्रकरणात मोक्का अंतर्गत हर्सूल तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यासह अन्य एका कैद्याचा आज मृत्यू झाला. कोठेवाडी प्रकरणातील कैद्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने तर दुसऱ्या कैद्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.
हर्सूल कारागृहात हाब्या पानमळ्या भोसले ( ५५, कैदी क्रमांक सी- ६५४४ ) हा मोक्का न्यायालयाने सुनावलेली शिक्षा भोगत होता. आज सकाळी ७ वाजेच्या दरम्यान त्याला कारागृहातून घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत होते. यावेळी हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला.
तर, रमेश नागोराव चक्रुपे ( 60, कैदी क्रमांक सी- ८५७२ ) हा आरोपी घाटी रुग्णालयातील वार्ड क्रमांक १० मध्ये उपचार घेत होता. आज पहाटे अडीज वाजेच्या सुमारास त्याचे उपचार दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, दोन्ही आरोपी हे बाहेरील जिल्ह्यातील होते. मागील काही काळापासून ते हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत होते.
काय होते कोठेवाडी प्रकरण ?
१७ जानेवारी २००१ रोजी मध्यरात्री साडेतीन वाजता कोठेवाडी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथे संपूर्ण वस्तीवर १० ते १५ आरोपींनी दरोडा घालून जबर मारहाण करीत चार महिलांवर सामूहिक बलात्कार केला होता. या वस्तीवरुन ४४ हजार ३५ रुपयांचे दागिने लुटले होते. सर्व १३ आरोपींना कोठेवाडी प्रकरणात नगरच्या न्यायालयाने जन्मठेप ठोठावण्यात आली होती. यावेळी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी काम पाहिले होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या कोठेवाडीतील दरोडा-बलात्कार प्रकरणासह आरोपींचा पाथर्डी, गंगापूर व वैजापूर तालुक्यांमध्ये दरोडा, मारहाण, बलात्कार, सामूहिक बलात्कार आदी गुन्ह्यातील सहभाग पोलिसांच्या निदर्शनास आला. यामुळे सर्व आरोपींवर औरंगाबादच्या विशेष मोक्का न्यायालयात खटला चालला. येथे १३ आरोपींना १२ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १० लाखांचा, तर एकूण १ कोटी ३० लाखांचा दंड मोक्का न्यायालयाने ठोठावला.