छत्रपती संभाजीनगरात पुन्हा करोडोंचे दोन घोटाळे! गुंतवणूकदारांचे पैसे उकळून संचालक पसार

By सुमित डोळे | Published: October 5, 2023 01:07 PM2023-10-05T13:07:12+5:302023-10-05T13:08:15+5:30

रक्कम ६० कोटींच्या पुढे : आभा इन्व्हेस्टमेेंट अँड लँड डेव्हलपर्सच्या संचालकांवर गुन्हा

Two scams worth crores again in Chhatrapati Sambhajinagar! Extortion of investors money by directors | छत्रपती संभाजीनगरात पुन्हा करोडोंचे दोन घोटाळे! गुंतवणूकदारांचे पैसे उकळून संचालक पसार

छत्रपती संभाजीनगरात पुन्हा करोडोंचे दोन घोटाळे! गुंतवणूकदारांचे पैसे उकळून संचालक पसार

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : शहरात कोट्यवधींच्या घोटाळ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आदर्श, देवाई महिला नागरी सहकारी पतसंस्थेनंतर आता आभा इन्व्हेस्टमेंट अँड लँड डेव्हलपर्सचे संचालक शेकडो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये उकळून पसार झाले आहेत. चिकलठाणा एमआयडीसीतील अलिशान कार्यालयाला अचानक कुलूप दिसल्यानंतर या गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक तपास करून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात पंकज शिवाजी चंदनशिव, त्याची पत्नी प्रियंका (रा. जयभवानीनगर), शिवाजी रोडे (रा. हर्सूल सावंगी), सोमीनाथ चंदनशिव, सोमीनाथ नरवडे यांच्यावर बुधवारी गुन्हा दाखल केला.

ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रवी वीर यांना २०२२ मध्ये रोडे यांच्यामार्फत चंदनशिवच्या फर्मविषयी माहिती मिळाली. चंदनशिव शेअर्स ट्रेडिंग फॉरेक्स क्रिप्टो करन्सी कमोडिटिज ट्रेडिंगचा व्यवसाय करत होता. गुंतवणुकीवर महिना ७ टक्के परतावा देण्याची हमी देतो, असेही रोडेने वीर यांना सांगितले. ऑगस्ट २०२२ मध्ये चिकलठाणा एमआयडीसीमधील गोल्डन सिटी सेंटरमधील कार्यालयात त्यांची पहिली भेट झाली. विश्वास वाटून वीर यांनी २ लाखांची गुंतवणूक केली. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये अडीच लाख, जानेवारी २०२३ मध्ये ३ लाखांची गुंतवणूक केली. चंदनशिवने जुलै २०२३ पर्यंत परतावा देऊन त्यानंतर परतावा देणे बंद केले. वीर यांनी पैशांची मागणी सुरू केल्यावर चंदनशिवने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहेत, सप्टेंबरमध्ये देताे, असे सांगून वेळ मारून नेली.

शेकडो गुंतवणूकदार, सर्व सुशिक्षित
सहायक आयुक्त धनंजय पाटील, निरीक्षक संभाजी पवार यांनी प्राथमिक तपास केला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तक्रारीत ५२ गुंतवणूकदारांचा उल्लेख असून, त्याव्यतिरिक्त बुधवारपर्यंत आयुक्तालयात ६० तक्रारी आल्या होत्या. २ कोटी ३० लाखांचा गुन्हा दाखल असून, तक्रारींचा वेग पाहता ६० कोटींच्या पुढे आकडा जाण्याची शक्यता आहे. सहायक आयुक्त धनंजय पाटील अधिक तपास करत आहेत. याच संचालकांनी ज्ञानोबा अर्बन क्रेडिट सोसायटीतदेखील कोट्यवधींचा घोटाळा केला आहे.

बॉण्डवर करार केला अन् कुलूप लावून पळाला
चंदनशिवने २०२१ मध्ये या फर्मची स्थापना केली होती. प्रत्येक गुंतवणूकदारासोबत १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर अकरा महिन्यांचे सामंजस्य करार केले, शिवाय व्याज कपातीचे अधिकार स्वत:कडे असतील, वीस दिवसांच्या आत गुंतवणूकदारांना उर्वरित रक्कम दिली जाईल, असेही त्यात नमूद केले. रकमेच्या बदल्यात त्याने काही गुंतवणूकदारांना धनादेशही दिले हाेते. मात्र, काही दिवसांपूर्वी कार्यालयाला कुलूप लावून, मोबाइल बंद करून संचालक पसार झाले.

दुसरा घोटाळा अधानेच्या संस्थेत
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत २०२ कोटींच्या घोटाळ्याच्या प्रमुख आरोपींपैकी एक देविदास अधाने याने स्वत:च्याही संस्था स्थापन केल्या होत्या. त्यापैकी यशस्विनी या संस्थेत जवळपास २८ कोटींचा घोटाळा झाल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात निदर्शनास आले आहे. अधाने दोन महिन्यांपासून पसार असून, त्याची पत्नी हर्सूल कारागृहात आहे. यशस्विनीच्या या घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी सिडको पोलिसांना अहवाल सादर करण्यात आला आहे, तर त्याच्या अन्य संस्थांचीही चौकशी सुरू असून, घोटाळ्याचा आकडा वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

Web Title: Two scams worth crores again in Chhatrapati Sambhajinagar! Extortion of investors money by directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.