वैजापुरात गोदावरी पात्रात पोहण्यास गेलेली दोन शाळकरी मुले बुडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 02:32 PM2018-08-27T14:32:05+5:302018-08-27T14:34:37+5:30
गोदावरी नदीत पोहण्यासाठी उतरलेली दोन शाळकरी मुले बुडाल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील बाबतरा येथे घडली.
वैजापुर : गोदावरी नदीत पोहण्यासाठी उतरलेली दोन शाळकरी मुले बुडाल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील बाबतरा येथे घडली. तुषार सतीश गांगड (१४) व विवेक कालीचरण कुमावत (१५) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत.
तुषार आणि विवेक हे दोघेही बाबतरा येथील रहिवासी असुन पुणतांबा येथे आठवीच्या वर्गात शिकत होते. रविवारी दूपारी कुटुंबियांसोबत गोदावरी नदीत पोहण्याचा आनंद दोघांनी घेतला होता. त्यामुळे त्यांना आज परत नदीत पोहण्याचा मोह अनावर झाला. आज सकाळी तुषार व विवेक या दोघांसोबत सार्थक एकनाथ भवर मुलगाही पोहण्यासाठी गेला होता. पण तो नदी पात्रात उतरला नाही. तुषार आणि विवेक पात्रात उतरले मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोघांना पाण्याचा नेमका अंदाज आली नाही. यामुळे दोघेही प्रवाहासोबत वाहून गेले.
दोघेजण प्रवाहासोबत वाहत जात असल्याचे पाहून सार्थकने तातडीने ग्रामस्थांना याची माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिस व महसुल प्रशासनाला दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागिय अधिकारी डॉ. संदिपान सानप, उपविभागिय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, वीरगाव पोलिस ठाण्याचे एपीआय अतुल येरमे व त्यांचे सहकारी व अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असुन ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. सकाळी सात वाजेपासुन शोधकार्य सुरु असून घटनास्थळी दोन बोटी दाखल झाल्या आहेत. तसेच २५ ते ३० ग्रामस्थसुद्धा बुडालेल्या मुलांचा शोध घेत आहेत.