हर्सूल परिसरात पाण्याच्या डबक्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 06:20 PM2018-07-09T18:20:36+5:302018-07-09T18:29:08+5:30
हर्सूल परिसरातील कोलठानवाडी रोडवरील एका शेतातील डबक्यात पोहताना दोन शाळकरी मुलांचा आज दुपारी मृत्यू झाला.
औरंगाबाद: नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्याशेजारील एका शेतातील डबक्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना कोलठाणवाडी रस्त्यावर सोमवारी (दि. ९)दुपारी अडिच ते तीन वाजेच्या सुमारास घडली.
सोहेल शफिक पठाण (११)आणि शेख युसूफ(१३,दोघे रा. यासीनकॉलनी, हर्सूल) अशी मृतांची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना हर्सूल पोलिसांनी सांगितले की, सोहेल पठाण आणि शेख युसूफ हे दोघेही शिक्षण घेतात. दुपारी अडिच वाजेच्या सुमारास शाळेतून घरी आल्यानंतर ते फिरायला जातो, असे सांगून घराबाहेर पडले.
या रस्त्याव सुमारे आठ फुट खोल असलेल्या या खड्ड्यात नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसाचे पाणी साचले होते. त्यांनी त्यांच्या अंगावरील कपडे काढून खड्ड्याच्या काठावर ठेवले आणि एका पाठोपाठ दोघेही पाण्यात उतरले. मात्र, पोहायलाच येत नसल्याने ते पाण्यात बुडाले. ही बाब परिसरातील नागरीकांच्या लक्षात येताच काहींनी पाण्यात उतरून बुडालेल्या सोहेल आणि युसूफ यांना बाहेर काढले. त्यांना बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी दोन्ही चिमुकल्यांना तपासून मृत घोषित केले.