दोन शाळकरी मुले गोदापात्रात बुडाली; बाबतरा गावावर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:27 AM2018-08-28T00:27:38+5:302018-08-28T00:32:55+5:30

तालुक्यातील बाबतरा येथे गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेली दोन शाळकरी मुले पाण्यात बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. विवेक कालीचरण कुमावत (१५) व तुषार सतीश गांगड (१४) अशी त्यांची नावे आहेत.

Two school children drown in the Godavari; Sadar on Babbar village | दोन शाळकरी मुले गोदापात्रात बुडाली; बाबतरा गावावर शोककळा

दोन शाळकरी मुले गोदापात्रात बुडाली; बाबतरा गावावर शोककळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : तालुक्यातील बाबतरा येथे गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेली दोन शाळकरी मुले पाण्यात बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. विवेक कालीचरण कुमावत (१५) व तुषार सतीश गांगड (१४) अशी त्यांची नावे आहेत.


सोमवारी सायंकाळपर्यंत अग्निशमन दल, वीरगाव पोलीस व महसूल प्रशासनाने ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचा गोदावरीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण शोध लागला नाही. अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले असून, या घटनेमुळे बाबतरा गावावर शोककळा पसरली आहे.
विवेक व तुषार या दोघांनी रविवारी दुपारी कुटुंबियासोबत नदीत पोहण्याचा आनंद लुटला होता. नदीत पोहण्याचा मोह अनावर झाल्याने सोमवारी विवेक, तुषार व सार्थक हे तिघे पुन्हा त्याच ठिकाणी पोहण्यासाठी गेले. सार्थक हा काठावरच बसला. विवेक व तुषार हे दोघे नदीत उतरले. मात्र, यावेळी पावसामुळे पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे प्रवाहाबरोबर वाहून गेले. इतर मुलांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थांनी तातडीने पाण्यात उड्या मारून शोध घेण्याचा प्रयत्न केला.


वीरगाव पोलिसांना ही माहिती कळविण्यात आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, सपोनि. अतुल येरमे यांनी घटनास्थळी भेट देऊन अग्निशमन दलाला पाचारण केले. महसूलच्या अधिकाऱ्यांनीही भेट दिली. दोन बोटींच्या साहाय्याने सकाळपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुलांचा शोध घेण्यात आला; पण मुले न सापडल्याने शोधकार्य थांबवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, एपीआय प्रतापसिंह बहुरे, जि.प. सदस्य पंकज ठोंबरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, पोलीस पाटील नवनाथ गायकवाड, अजय पाटील चिकटगावकर, पंचायत समितीचे उपसभापती प्रभाकर बारसे, रमेश पाटील बोरनारे, केशव मोरे, शिवाजी गंगुले, सरपंच लक्ष्मण मुकिंद, सागर गायकवाड, बाबासाहेब जगताप, दिगंबर तुरकणे, धनंजय धोर्डे, तलाठी राजपूत आदींनी भेट दिली.
पुणतांबा शाळेचे विद्यार्थी
विवेक व तुषार हे पुणतांबा (जि. अहमदनगर) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात. तुषार हा आठवीचा तर विवेक हा नववीचा विद्यार्थी असून, हे दोघे सार्थक एकनाथ भवर या विद्यार्थ्यासोबत गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेले होते. यापैैकी सार्थक पोहायला गेलाच नव्हता.

Web Title: Two school children drown in the Godavari; Sadar on Babbar village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.