कारचा पाठलाग करून ३७ किलो गांजासह दोन तस्कर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 12:25 PM2021-06-07T12:25:41+5:302021-06-07T12:26:25+5:30

Crime in Aurangabad : उपनिरीक्षक अमोल देशमुख हे रात्रीच्या गस्तीवर असताना खबऱ्याकडून त्यांना गांजा तस्करीची माहिती मिळाली

Two smugglers arrested with 37 kg of cannabis | कारचा पाठलाग करून ३७ किलो गांजासह दोन तस्कर जेरबंद

कारचा पाठलाग करून ३७ किलो गांजासह दोन तस्कर जेरबंद

googlenewsNext
ठळक मुद्देआंध्र प्रदेशातून शहरात आणला जात होता गांजा

औरंगाबाद : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इनोव्हा कारचा पाठलाग करून गांजाची तस्करी करणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून १ लाख ८६ हजार ५०० रुपये किमतीचा ३७ किलो ३०० ग्रॅम गांजा जप्त केला. त्यावेळी अन्य दोघे जण पळून जाण्यास यशस्वी झाले. हा सिनेस्टाईल थरार रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास बीड बायपासकडून विमानतळाकडे येणाऱ्या जुन्या बंद वळण रस्त्यावर घडला.

श्रीकांत लक्ष्मण बनसोडे (३१) व जगन्नाथ श्रीमंत लाटे (३६, दोघेही रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा) अशी अटक करण्यात आलेल्या गांजा तस्करांची नावे आहेत, तर या कारवाईच्यावेळी सनी व भिकन कडूबा रिठे (दोघेही रा. बाजारतळ, चिकलठाणा) अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. उपनिरीक्षक अमोल देशमुख हे रात्रीच्या गस्तीवर असताना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, श्रीकांत बनसोडे हा अन्य साथीदार मिळून आंध्र प्रदेशातील दाराकोंडा येथून इनोव्हा कारमधून (एमएच २०- एए- ४४१३) शहरात गांजा आणत आहेत. त्यानुसार उपनिरीक्षक देशमखू, सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, अंमलदार ओमप्रकाश बनकर, विरेश बने, नितीन देशमुख, दादासाहेब झारगड आदी केंब्रिज शाळेजवळ दबा धरून बसले. दरम्यान, पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास खबऱ्याने सांगितलेल्या वर्णाची इनोव्हा कार आली. तिला थांबविण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांना हुलकावणी देत ती बीड बायपासच्या दिशेने सुसाट गेली. पोलिसांनी कारचा पाठलाग केला. 

तेव्हा ती बायपासवरून विमानतळाकडे जाणाऱ्या जुन्या वळण रस्त्याकडे गेली असता पोलिसांनी त्या कारसमोर गाडी आडवी लावून कारमधील श्रीकांत बनसोडे, जगन्नाथ लाटे या दोघांना पकडले. तोपर्यंत सनी व भिकन रिठे हे दोघे पळून जाण्यास यशस्वी झाले. पोलिसांनी कारमधून १ लाख ८६ हजार ५०० रुपये किमतीचा ३७ किलो ३०० ग्रॅम गांजा, १० लाख ५० हजार रुपये किमतीची इनोव्हा कार व एक १० हजार रुपये किमतीचा मोबाइल जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two smugglers arrested with 37 kg of cannabis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.