मागची काच निखाळल्याने धावत्या स्कूल बसमधून पडून दोन विद्यार्थी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 07:54 PM2018-12-03T19:54:47+5:302018-12-03T20:18:02+5:30
बसमधून दोन विद्यार्थी पडल्याचे चालकाच्या आणि शिक्षकांच्या लक्षात न आल्याने बसचालक सुसाट पुढे जात होता.
औरंगाबाद: जनावराप्रमाणे १२२ विद्यार्थ्यांना बसमध्ये कोंबून त्यांना पंढरपुर येथे घेऊन जाणाऱ्या धावत्या बसची मागील काच अचानक निखळल्याने बसमधील दोन विद्यार्थी रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे बसमधून विद्यार्थी पडल्याचे बसचालकाला न समजल्याने तो सुसाट पुढे जात होता. यावेळी विद्यार्थ्यांनी आणि प्रत्यक्षदर्शी वाहनचालकांनी आरडओरड करून बस थांबविली. त्यानंतर गंभीर जखमी विद्यार्थ्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात दुपारी तीन वाजेच्या सुमारास नगर नाक्याजवळ घडला.
तेजस संजय घोंगडे (वय ८ रा. रांजणगाव श्ो.) आणि सम्राट सुरेंद्र अभंग (वय ७)अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, शहरातील खोकडपुरा येथील शिवाजी हायस्कुलमध्ये आज गोवर-रुबेला लसीकरण होते. या संस्थेची दुसरी शाळा रांजणगाव शेणपुंजी येथे आहे. तेथील शाळेतील सुमारे १२२ विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी आज सकाळी एक बस आणि टेम्पो ट्रॅव्हल्समधून शहरातील खोकडपुरा येथील शिवाजी हायस्कुलमध्ये आणण्यात आले होते. वाळूज येथील शांताई शाळेची बस विद्यार्थ्यांना नेण्यासाठी बोलविण्यात आली होती.
दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास लसीकरणाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर शांताई शाळेच्या बसमध्ये (क्रमांक एमएच-२० डब्ल्यू ९७५०) सर्वच्या सर्व १२२ विद्यार्थ्यांना कोंबण्यात आले आणि एम.के. राठोड, एम.सी.सुरनार या शिक्षकांना बसमध्ये बसविण्यात आले. विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन बस शिवाजी हायस्कुल येथून पंढरपुरकडे निघाली. बसमधील विद्यार्थी गर्दीमुळे गुदमरून गेले होते. छावणीतील लोखंडी पुल ते नगर नाका दरम्यान बस असताना बसची मागील काच अचानक निखळली आणि मागील सिटावर बसलेला तेजस आणि सम्राट हे दोन विद्यार्थी सुसाट बसमधून खाली रस्त्यावर पडले. यामुळे बसमधील विद्यार्थ्यांनी प्रचंड आरडाओरड केली.
३०० मीटर पाठलाग करून प्रत्यक्षदर्शींनी रोखली बस
बसमधून दोन विद्यार्थी पडल्याचे चालकाच्या आणि शिक्षकांच्या लक्षात न आल्याने बसचालक सुसाट पुढे जात होता. मात्र प्रत्यक्षदर्शींनी ही घटना पाहताच घटनास्थळापासून सुमारे ३०० मीटरपर्यंत पाठलाग करून बस थांबविली. काही जणांनी त्यांची वाहने बाजूला घेत जखमी विद्यार्थ्यांना उचलून बाजुला घेतल्याने मोठा अनर्थ टळला.