गाळ, गवत काढण्यासाठी दोन पाणबुड्या दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:34 PM2019-03-31T23:34:59+5:302019-03-31T23:35:36+5:30
जायकवाडी धरणातील पाणीपातळी खालावल्यानंतर महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. धरणातील आपत्कालीन पंप सुरू करण्यात आले आहेत. महापालिका ज्या विहिरीतून पाण्याचा उपसा करते तेथे गाळ, गवत मोठ्या प्रमाणात येत असल्याने पाणी उपसण्यास बराच त्रास होत आहे. रविवारी पुणे येथून दोन पाणबुड्या पाचारण करण्यात आल्या. त्यांच्याकडून गाळ, गवत काढण्याचे काम सुरू करण्यात आले. शहरातील महत्त्वाच्या जलकुंभावर सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत.
औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाणीपातळी खालावल्यानंतर महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. धरणातील आपत्कालीन पंप सुरू करण्यात आले आहेत. महापालिका ज्या विहिरीतून पाण्याचा उपसा करते तेथे गाळ, गवत मोठ्या प्रमाणात येत असल्याने पाणी उपसण्यास बराच त्रास होत आहे. रविवारी पुणे येथून दोन पाणबुड्या पाचारण करण्यात आल्या. त्यांच्याकडून गाळ, गवत काढण्याचे काम सुरू करण्यात आले. शहरातील महत्त्वाच्या जलकुंभावर सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत.
जायकवाडी धरणाची पाणीपातळी मृतसाठ्यात पोहोचली आहे. तेथून मनपाच्या विहिरीपर्यंत पाणी आणण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागत आहेत. शहराला सध्या १४० एमएलडी पाणी मिळत होते, त्यामध्ये २० एमएलडीची घट झाली आहे. त्यामुळे शहरातील पाणीटंचाई अधिक गंभीर बनली आहे. पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. तीन दिवसांआड पाणीपुरवठा असताना पाच ते सहा दिवसांनी होत आहे. पाण्यासाठी मनपावर मोर्चे, धरणे, आंदोलने होत आहेत. शहराचा पाणीपुरवठा नियंत्रित ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जायकवाडी येथील आपत्कालीन पंपगृहाची दुरुस्ती करून दोन आपत्कालीन पंप सुरू करण्यात आले. तसेच धरणातील पाणी कमी झाल्यामुळे पाण्यात कचरा, गाळ, गवत, शेवाळ येत आहे. ते पंपात व विहिरीत येत असल्याने पाण्याचा दाब कमी होऊन पंप बंद पडत आहेत. अशा परिस्थितीत पंप बंद पडू नये, गवत, कचरा, शेवाळ अडकल्यास तातडीने काढले जावे याकरिता पुणे येथील पाणबुड्या बोलाविण्यात आल्या आहेत. दोन पाणबुड्या साहित्यासह रविवारी जायकवाडीत दाखल झाल्या आहेत. त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्याचे उपअभियंता किरण धांडे यांनी सांगितले.
शहरातील सिडको एन-५, एन-७, कोटला कॉलनी, क्रांतीचौक, शिवाजीनगर, ज्युबिली पार्क, पहाडसिंगपुरा, गारखेडा या प्रमुख जलकुंभांवर नागरिकांकडून आंदोलने, पाणीपुरवठा बंद करणे, टँकर थांबविणे, कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना घडू नये याकरिता सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
शहरात पाणी वाढविण्यासाठी जलतज्ज्ञ राजेंदत्त होलानी यांची नियुक्ती मनपाने केली आहे. शहरातील वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवून तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने होलानी संस्थेच्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांना बोलावण्यात येणार आहे. हे कर्मचारी मनपाच्या कर्मचाऱ्यांसोबत शहरात फिरून पाईपलाईनची पाहणी करतील.