खंबाळा दरोडाप्रकरणी दोन संशयिताना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:04 AM2021-07-07T04:04:56+5:302021-07-07T04:04:56+5:30
खंबाळा फाटा येथील जिजाराम गोरसे यांच्या शेतवस्तीवरील घरावर २ जुलैच्या मध्यरात्री चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी जिजाराम यांच्या मुलाला ...
खंबाळा फाटा येथील जिजाराम गोरसे यांच्या शेतवस्तीवरील घरावर २ जुलैच्या मध्यरात्री चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी जिजाराम यांच्या मुलाला मारहाण करताच यात मुलगा रवींद्र गोरसेचा मृत्यू झाला. तर सून मोनिका ही गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तसेच पोलीस प्रशासनही हादरले गेले. या घटनेचा तपास करण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते. विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. प्रसन्ना, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांची वेगवेगळी पथके तयार केली होती.
नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. त्यानंतर शिताफीने दोन संशयिताना रविवारी सायंकाळी अटक करण्यात आली. अटक केलेले संशयित दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. आरोपींचा तपास लावण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक सम्राट राजपूत या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
---
चोरीच्याच उद्देशाने आले असल्याचा दावा
चोरीच्या उद्देशानेच आरोपी हे गोरसे वस्तीवर आले होते. खंबाळा येथे त्या रात्री निर्मळ व त्रिभुवन वस्तीवर चोरीचा प्रयत्न झाला होता, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. चोरीच्या उद्देशानेच ही घटना घडली. अन्य शक्यता मात्र त्यांनी फेटाळल्या. आरोपींची नावे मात्र त्यांनी उघड केली नाही. आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. ते बाहेर बाहेर राहणे योग्य नाही. त्यामुळे त्यांना शिक्षा होईल, पुढील तपास करायचा असून, तांत्रिक अडचणींमुळे तसेच न्यायालयाच्या निर्देशानुसार आरोपींची नावे उघड करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
----
फोटो : आरोपींचा शोध लावण्यात महत्त्वाची कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचारी.
050721\img_20210705_133909.jpg
खंबाळा दरोडा प्रकरण पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार माहिती देताना