शहरात बसविणार दोन रणगाडे
By Admin | Published: July 15, 2015 12:37 AM2015-07-15T00:37:25+5:302015-07-15T00:47:09+5:30
औरंगाबाद : शहरात लवकरच लष्कराचे दोन रणगाडे तैनात करण्यात येणार आहेत. मात्र, हे रणगाडे सुरक्षेसाठी नव्हे तर शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी ठेवले जाणार आहेत
औरंगाबाद : शहरात लवकरच लष्कराचे दोन रणगाडे तैनात करण्यात येणार आहेत. मात्र, हे रणगाडे सुरक्षेसाठी नव्हे तर शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी ठेवले जाणार आहेत. लष्कराने मनपाला हे रणगाडे देण्याचे मान्य केले असून, ते बसविण्याच्या जागा निश्चित कराव्यात असे म्हटले आहे. जागा निश्चित होताच लष्कराकडून त्याठिकाणी हे रणगाडे आणून बसविले जाणार आहेत.
शहराच्या सौंदर्यात भर घालण्याच्या हेतूने काही महानगरांमध्ये तेथील चौकात लष्कराचे खरेखुरे रणगाडे ठेवण्यात आलेले आहेत. यामुळे नागरिकांना आणि विशेषत: लहान मुलांना लष्कराच्या शस्त्रांविषयीची माहितीही मिळते. म्हणून औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने शहरासाठी रणगाडे मिळावेत म्हणून प्रयत्न केले जात होते. त्यासाठी लष्कराच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा केली जात होती.
या पार्श्वभूमीवर अखेर सोमवारी औरंगाबाद लष्कर तळाचे प्रमुख मनोजकुमार यांनी मनपाला दोन रणगाडे देण्याचे मान्य केले.
हे रणगाडे बसविण्यासाठी मनपाने जागा निश्चित कराव्यात, या जागा निश्चित होताच दोन्ही रणगाडे तेथे बसविले जातील, असेही पत्रात म्हटले आहे.
लष्कर तळाचे अॅडमिनिस्ट्रेटिव्ह कमांडन्ट कर्नल ए. पी. सिंग यांच्या स्वाक्षरीने मनपाला हे पत्र देण्यात आले आहे. मनपातील अधिकाऱ्यांनी दोन्ही रणगाडे बसविण्यासाठी जागांचा शोध सुरू केला आहे. त्यानुसार एक रणगाडा हडकोतील स्वामी विवेकानंद उद्यानात आणि दुसरा एका महत्त्वाच्या चौकात बसविण्यावर विचार केला जात आहे. १
रणगाड्यांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असली तरी विविध चौकांतील वाहतूक बेटांच्या सुशोभीकरणाकडे मात्र मनपाचे दुर्लक्ष झाले आहे. २
महापौर त्र्यंबक तुपे यांनी खाजगी उद्योजक आणि इतर व्यक्तींच्या मदतीने शहरातील वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करून घेण्याचा विचार मांडला होता. त्यासाठी त्यांनी उद्योजक आणि इतर व्यक्तींना तसे आवाहन केले होते. ३
या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक उद्योजक पुढे आले. त्यांनी शहरातील १० चौकांतील वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करण्याची तयारी दर्शवीत तसे प्रस्ताव दाखल केले; परंतु हे प्रस्ताव मनपा आयुक्तांकडे मंजुरीसाठी तसेच पडून आहेत.