चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी आलेले दोन चोरटे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:06 AM2021-09-26T04:06:06+5:302021-09-26T04:06:06+5:30
औरंगाबाद : वेगवेगळ्या भागांतून दुचाकींची चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या दोन चोरट्यांना हर्सूल पोलिसांनी मोठ्या शिताफीने हर्सूल टी पॉईंट ...
औरंगाबाद : वेगवेगळ्या भागांतून दुचाकींची चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या दोन चोरट्यांना हर्सूल पोलिसांनी मोठ्या शिताफीने हर्सूल टी पॉईंट येथे सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत.
ऋषिकेश बिसन जाधव (रा. इंदापूर, ता. खुलताबाद) आणि रोहित रमेश भालेराव (रा. हडको एन १३) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ऋषिकेश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील वाहनचोर आहे. तो केवळ मोपेड दुचाकी चोरतो. सहा ते सात महिन्यांपूर्वी त्याला वेदांतनगर पाेलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरी केल्या. चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी तो साथीदारासह हर्सूल टी पॉईंट येथे येणार असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक अमोल देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रफीक शेख, हवालदार विश्वास शिंदे, शिवाजी शिंदे, शिवाजी दांडगे, श्रावण गुंजाळ आणि देवचंद महेर यांच्या पथकाने आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. यावेळी संशयित आरोपी एका दुचाकीवरून तेथे आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याजवळील दुचाकी काही दिवसांपूर्वी जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे समोर आले. चोरलेल्या दुचाकी आरोपी रोहितच्या मदतीने विक्री करीत असल्याची कबुली दिली. चोरलेल्या दुचाकी तो रोहितच्या घराजवळील मैदानावर लपवून ठेवायचा. पोलिसी खाक्या दाखविल्यांनतर त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात पथकाला यश आले.