जमावाच्या मारहाणीत दोन चोरट्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:57 AM2018-06-09T00:57:34+5:302018-06-09T00:58:11+5:30

तालुक्यातील पानव-चांडगाव येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि.८) पहाटे ५ वाजेदरम्यान आठ संशयित चोरांची टोळी पकडून त्यांना बेदम मारहाण केल्याने यातील दोघांचा उपचारादरम्यान औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात मृत्यू झाला, तर इतर ६ जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालय व वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 Two thieves die in a mob attack | जमावाच्या मारहाणीत दोन चोरट्यांचा मृत्यू

जमावाच्या मारहाणीत दोन चोरट्यांचा मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : तालुक्यातील पानव-चांडगाव येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि.८) पहाटे ५ वाजेदरम्यान आठ संशयित चोरांची टोळी पकडून त्यांना बेदम मारहाण केल्याने यातील दोघांचा उपचारादरम्यान औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात मृत्यू झाला, तर इतर ६ जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालय व वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जवळपास ५० ते ६० गावांतील नागरिक रात्रभर गावात खडा पहारा देत आहेत. शुक्रवारी पहाटे ५ ते ६ वाजेदरम्यान पानव-चांडगाव येथील रेल्वे पटरीजवळ ग्रामस्थांनी आठ संशयित चोरट्यांना पाठलाग करून पकडले व त्यांना गावात आणून बेदम चोप दिला.
यात सर्व जण गंभीर जखमी झाले. यातील चार जणांना वैजापूर पोलिसांनी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविले असता उपचारादरम्यान भारत सोनवणे (२८, मिटमिटा, औरंगाबाद) व शिवाजी शिंदे (४५, मुकुंदवाडी, औरंगाबाद) या दोघांचा मृत्यू झाला.
दगडू काळे (२६, राजापूर, बीड) व रमेश भाऊराव पवार (२८, अनंतवाडी गेवराई, बीड) यांना घाटीच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. इतर जखमी गणेश सोनवणे (२६, शिऊर, वैजापूर), गंगाराम रामदास भोसले (२२, बग्गेवाडी, बीड), राजेश मुन्ना भोसले (२५, राजापूर, बीड) व गमतीदास व्यंकटी काळे (५०, मुकुंदवाडी, औरंगाबाद) या चार जणांवर वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. वैजापूर पोलिसांनी जखमींचे जबाब घेतले आहेत. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणाविरुद्धही गुन्हा दाखल झालेला नाही.
संशयित चोरांचे पुरावे खोटे
वैजापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आठ संशयित चोरांचे उपजिल्हा रुग्णालयात जबाब घेऊन तपासचक्र फिरवले.
मात्र, संशयित चोरांनी पोलिसांना सांगितलेले नाव व पत्ता केवळ तीन जणांचे खरे असल्याचे समोर आले आहे, तर पाच जणांनी चुकीचे नाव व पत्ता दिला.
ग्रामस्थांनी पोलिसांचे
मोबाईल हिसकावले
चांडगाव येथे पोलिसांचे पथक पोहोचले, त्यावेळी जवळपास दीड ते दोन हजार ग्रामस्थांचा जमाव जमलेला होता. यावेळी पोलीस मोबाईलमध्ये शूटिंग करून आपल्यावर गुन्हे दाखल करतील, या धास्तीने ग्रामस्थांनी पोलिसांचे मोबाईल हिसकावून घेतले. पोलिसांनीही शांत राहून संशयित चोरांना ताब्यात घेऊन गाडीत बसविले त्यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांचे मोबाईल परत केले.
पोलिसांनी केली जमावाच्या तावडीतून चोरांची सुटका
गेल्या महिन्यापासून तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने दहशत पसरली आहे. चोरांच्या भीतीने गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. रात्री जागरण करून चोरांना रंगेहाथ पकडण्यासाठी गावकरी त्यांच्या मागावर थांबत आहेत. शुक्रवारी सकाळी चोरटे आल्याची माहिती मिळताच चांडगाव, नांदगाव व परिसरातील दीड ते दोन हजार गावकºयांचा जमाव त्याठिकाणी आला व त्यांनी आठ जणांना बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे सपोनि. रामहरी जाधव व अन्य पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व चोरांना संतप्त जमावाच्या तावडीतून सोडविले. जखमींना वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी झालेल्या चौघांना औरंगाबाद येथे पाठविण्यात आले. पोलीस रवीकुमार कीर्तीकर, भारत पाटील, प्रवीण अभंग, गणेश पाटील व आय बाईक पथकातील गोपाळ जानवाल यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन जखमींचे जबाब नोंदवले. दरम्यान, याप्रकरणी सपोनि. रामहरी जाधव यांच्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरांच्या धास्तीने ७ दिवसात १३ हजार ‘टॉर्च’ची विक्री
४वैजापूर तालुक्यात भीतीचे वातावरण वाढत असून चोरावर ‘वॉच’ ठेवण्यासाठी बाजारात ‘टॉर्च’ला मागणी वाढत आहे.आश्चर्य म्हणजे चोरांच्या धास्तीने तालुक्यात ७ दिवसात तब्बल १३ हजार ‘टॉर्च’ विक्री झाल्याची विक्रमी नोंद प्रथमच तालुक्यात झाल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स दुकान मालकांनी दिली. ग्रामीण भागात रात्रीचे ९ वाजून गेले की प्रत्येक नागरिकांच्या हातात काठ्या, टॉर्च आणि लोखंडी सळया असतात.
४काहींच्या हातात धारदार शस्त्रेही असतात. जागोजागी ८ ते १० माणसांचा जथ्था आवाज करत शोधक नजरेने सर्वत्र फिरू लागतो. रस्त्यातल्या प्रत्येकाकडे संशयाने बघू लागतो. कधीतरी दुरून आवाज येतो. शेजारच्या वस्तीत चोर शिरल्याची आवई उठते, की जथ्था बेभान होऊन त्या दिशेने धावत सुटतो.

Web Title:  Two thieves die in a mob attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस