दोन दिवसांत हजार अर्ज
By Admin | Published: October 19, 2014 12:15 AM2014-10-19T00:15:27+5:302014-10-19T00:21:34+5:30
लातूर : महाराष्ट्र शासनातर्फे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) साठी आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे़ अर्जाची मुळ प्रत प्रत्येक तालुक्याच्या
लातूर : महाराष्ट्र शासनातर्फे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) साठी आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे़ अर्जाची मुळ प्रत प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे ३० आॅक्टोबरपर्यंत सादर करता येणार आहे. १७ व १८ आॅक्टोबर या दोन दिवसांमध्ये १ हजार विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे अर्ज दाखल केले आहेत.
डीटीएड व बीएड विद्यार्थ्यांसाठी दुसरी परीक्षा घेण्यात येत आहे. यावर्षी १४ डिसेंबर रोजी जिल्हानिहाय परीक्षा केंद्रांवर टीईटीची परीक्षा होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. १ आॅक्टोबरपासून आॅनलाईन अर्ज सादर केले जात आहेत. १ ते २२ आॅक्टोबर दरम्यान आॅनलाईन अर्ज भरून त्याची मुळ प्रत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे देण्यात येत आहे. त्यामुळे लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. दोन दिवसांत जवळपास १ हजार विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जांच्या मुळ प्रती दाखल केल्या आहेत.
राज्य शासनाकडून वर्षभरात डीएड्. व बीएड.च्या विद्यार्थ्यांसाठी टीईटीची ही दुसरी परीक्षा घेण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या भावी शिक्षकांना शासनाने जाहिरात काढताच अर्ज भरण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
यावेळी जिल्हानिहाय परीक्षा केंद्र देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचीे सोय होणार आहे. शिवाय, आॅनलाईन अर्ज सादर केल्यावर त्याची मूळ प्रत सर्व तालुक्यांच्या ठिकाणी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात जमा करण्यात येत आहेत.
लातूर जिल्ह्यात औसा, निलंगा, उदगीर, लातूर, जळकोट, अहमदपूर, रेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ व चाकूर येथील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात अर्जांची मुळ प्रत स्वीकारली जात आहे. अर्जदारांनी आॅनलाईन अर्ज भरून त्याची मुळ प्रत शिक्षण विभागाकडे द्यावी, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
१३ ते १५ आॅक्टोबर निवडणुकीमुळे सुट्या असल्याने १६ आॅक्टोबर रोजी ६२५ अर्ज एकाच दिवशी जमा झाले होते़ १७ व १८ आॅक्टोबर या दोन दिवसात १००० अर्ज जमा करण्यात आले आहेत़ लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अर्ज महिला सक्षमीकरण विभागाच्या इमारतीत स्वीकारले जात आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. (प्रतिनिधी)
आॅनलाईन अर्ज दाखल करताना डीएडच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज चलनाद्वारे बँक शुल्क खुल्या प्रवर्गासाठी ५०० रुपये तर एससी, एसटी, अपंग यांच्यासाठी २५० रुपये आहे़ बीएडच्या विद्यार्थ्यांनाही हेच शुल्क आहे़ तर ज्यांना दोन्ही परीक्षा (डीएड, बीएड) द्यावयाच्या आहेत, त्यांच्यासाठी खुला गट ८०० रुपये तर एससी, एसटी, अपंग यांच्यासाठी ४०० रुपये भरावे लागणार आहे़ चलन भरण्याची अंतिम तारीख २७ आॅक्टोबर आहे़ दिवाळीत बँकांना सुट्या असल्याने विद्यार्थ्यांनी दिवाळीपूर्वीच अर्ज भरण्यासाठी घाई केली आहे. दोन दिवसांत शिक्षण विभागाकडे एक हजारांवर अर्ज प्राप्त झाले आहेत.