प्रवाशांत खळबळ; लाल दिवा दाखवून रेल्वेत लुटारू घुसले, तीन तासांत दोन ठिकाणी धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2022 07:26 PM2022-04-02T19:26:18+5:302022-04-02T19:26:38+5:30
रेल्वेवर दगडफेक करीत रेल्वे डब्यात घुसून लुटले
औरंगाबाद : मुंबई-नांदेड नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेगाडीला पोटूळ रेल्वे स्टेशनजवळ लाल दिवा दाखवून थांबवून रेल्वेत घुसलेल्या चार ते पाच दरोडेखोरांनी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, तर मोबाईल हिसकावल्याची घटना घडल्यानंतर शुक्रवारी रात्री १२.५५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती देऊनही पोलीस यंत्रणा सक्रिय न झाल्याने रात्री पावणेतीन वाजेच्या सुमारास नांदेड-मनमाड या पॅसेेंजर रेल्वेला अशाच प्रकारे थांबवून दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून प्रवाशांना लुटल्याची दुसरी घटना घडल्याने प्रवाशांत खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी औरंगाबाद लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मुंबईहून औरंगाबाद मार्गे नांदेडला निघालेली नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेगाडी शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास लासूर स्टेशन येथून औरंगाबादकडे येत होती. सुमारे १२.५५ वाजेच्या सुमारास पोटूळ रेल्वे स्टेशन येथील ग्रीन सिग्नलला दरोडेखोरांनी कपडा बांधून झाकले. यामुळे केवळ लाल सिग्नल रेल्वे मोटारमनला दिसल्याने स्टेशनजवळच चालकाने गाडी थांबविली. गाडी थांबताच धारदार शस्त्रे घेऊन रेल्वेतील एका डब्यात घुसलेल्या दरोडेखोरांनी प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करण्यास सुरुवात केली. यावेळी सुनीता सुभाष माचे यांच्या गळ्यातील सव्वा तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावून घेतले, तर रतन भास्कर हिवराळे यांचा मोबाईल लुटला. यानंतर अन्य प्रवाशांना धमकावत त्यांचेही मोबाईल आणि रोकड हिसकावून घेतली. सुमारे दहा मिनिटे धुमाकूळ घालून दरोडेखोर रेल्वेतून बाहेर पडले. हा प्रकार रेल्वेचालकाच्या निदर्शनास येताच त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथील पोलिसांना कळविली. याप्रकरणी सुनीता सुभाष माचे यांच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक साहेबराव कांबळे तपास करीत आहेत.
पावणेतीन वाजेच्या सुमारास पुन्हा लूटमार
निडर लुटारूंनी नांदेड-मनमाड या डेमो पॅसेंजर रेल्वेलाही अशाच प्रकारे पोटूळ स्टेशनजवळ लाल सिग्नल दाखवून थांबविले. यानंतर रेल्वेवर दगडफेक करीत रेल्वे डब्यात घुसून लुटल्याची घटना घडली. अवघ्या काही मिनिटांत लूटमार करून ते पसार झाले.
पोलीस अधीक्षकांची घटनास्थळाला भेट
या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस दलाच्या अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी शनिवारी सकाळी घटनास्थळी माहिती जाणून घेतली. रेल्वेचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज पगारे, पोलीस निरीक्षक साहेबराव तुपे आणि एल.सी.बी.चे निरीक्षक भाले यांना त्यांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे निर्देश दिले.