बजाजनगरातून दोन दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:02 AM2021-07-27T04:02:56+5:302021-07-27T04:02:56+5:30
वाळूज महानगर : अज्ञात चोरट्यांनी बजाजनगरातून दोन दुचाकी लांबविल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. संजय गोरखनाथ ...
वाळूज महानगर : अज्ञात चोरट्यांनी बजाजनगरातून दोन दुचाकी लांबविल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. संजय गोरखनाथ खरवार (रा. बजाजनगर) यांनी ९ जुलै रोजी घरासमोर दुचाकी (क्रमांक एम.एच.२०,एफडी १०१६) उभी केली होती. अज्ञात चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली. दुसऱ्या घटनेत गणेश सुखदेव तेलंगे (रा. बजाजनगर) यांनी १५ जुलै रोजी दुचाकी (क्रमांक एम.एच.२१, ए.जे.३१८४) बजाजनगरातील कोलगेट चौकात उभी केली होती. अज्ञात चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली.
------------------
वाहतुकीस अडथळा; वाहनधारकाविरुद्ध गुन्हा
वाळूज महानगर : बजाजनगरातील मोरे चौकात रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल रहेमान साले (टीव्ही सेंटर, औरंगाबाद) यांनी त्यांचे वाहन (क्रमांक एम.एच.२०, ई.जी.७२२८) रस्त्यावर उभे केले होते. या वाहनामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याचे अब्दुल रहेमान यांच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
वाळूजला ग्रामोदयतर्फे वृक्षारोपण
वाळूज महानगर : वाळूज येथे ग्रामोदयतर्फे नुकतेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामोदयचे अविनाश गायकवाड व नागरिकांच्या उपस्थितीत ठिकठिकाणी विविध जातींची ५० झाडे लावण्यात आली. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी नागरिकांनी वृक्षारोपणासाठी पुढाकार घेत ही झाडे जगविण्याचा संकल्प केला आहे.
---------------------------
कमळापूर फाट्यावर साचले पावसाचे पाणी
वाळूज महानगर : कमळापूर फाट्यावर पावसाचे पाणी साचत असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रांजणगावातून कमळापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाजवळ पाऊस आल्यानंतर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत असल्याने पादचारी व वाहनधारकांना ये-जा करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
-------------------------
सीएट रोडवर जड वाहनांचा ठिय्या
वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सीएट रोडवर सर्रासपणे जड वाहने उभी केली जात असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात मालाची ने-आण करणारी जड वाहने रस्त्यावर रात्रं-दिवस उभी असतात. रस्त्यालगत उभ्या राहणाऱ्या या जड वाहनांमुळे ये-जा करणाऱ्या कामगार, नागरिक व वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जड वाहनधारकांविरुद्ध कारवाई होत नसल्याने वाहनधारक व कामगारांत नाराजीचा सूर उमटत आहे.