उद्योगनगरीत दोन दुचाकी चोर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 18:12 IST2020-10-11T18:12:00+5:302020-10-11T18:12:23+5:30
वाळूज उद्योग नगरीत दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी रविवार दि. ११ रोजी जेरबंद केले. या चोरट्यांचा ताब्यातून विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या दीड लाख रुपये किंमतीच्या ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

उद्योगनगरीत दोन दुचाकी चोर जेरबंद
वाळूजमहानगर: वाळूज उद्योग नगरीत दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी रविवार दि. ११ रोजी जेरबंद केले. या चोरट्यांचा ताब्यातून विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या दीड लाख रुपये किंमतीच्या ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
वाळूज उद्योगनगरीत गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी रांजणगाव येथील ऋषिकेश तुपे यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी तपासाची चक्रे फिरवत चोरट्यांचा शोध सुरू केला होता. गुप्त बातमीदाराकडून दुचाकी चोराची माहिती देताच पोलीस पथकाने रांजणगाव येथे छापा मारून सखाराम विश्वनाथ जगताप (२९ रा. रांजणगाव शेणपुंजी) व प्रताप विष्णू कोरडे (२९ रा. माऊलीनगर कमळापूर ता. गंगापूर) या दोघांना पकडले.
या दोघांनी वाळूज एमआयडीसी परिसरातून ३ दुचाकी तर बदनापूर व साकरखेर्डा परिसरातुन प्रत्येकी एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलीस पथकाने आरोपींनी लपवून ठेवलेल्या १ लाख ५५ हजार रुपये किंमतीच्या ६ दुचाकी जप्त केल्या आहेत. रांजणगाव परिसरात पकडलेले दोन्ही आरोपी अट्टल दुचाकी चोर असून त्यांच्याकडून आणखी काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी वर्तविली.
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे, सहायक फौजदार रमाकांत पटारे, पोहेका कय्यूम पठाण, रेवनाथ गवळे, पोका नवाब शेख, विनोद परदेशी, सुधीर सोनावणे, हरीकराम वाघ, बंडू गोरे, दिपक चव्हाण, दिपक मतलबे आदींनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली.