लस घेतलेले दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:02 AM2021-02-20T04:02:16+5:302021-02-20T04:02:16+5:30
औरंगाबाद : जगभरात हाहाकार माजविण्याऱ्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीच्या रूपात ढाल उपलब्ध झाली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा डॉक्टर्स ...
औरंगाबाद : जगभरात हाहाकार माजविण्याऱ्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीच्या रूपात ढाल उपलब्ध झाली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सुरक्षेची भावना वाढत असताना शहरात ही लस घेतलेले दोन खासगी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक बाब गुरुवारी समोर आली.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस दिला जात आहे. ही लस घेतल्यानंतर ३ आठवड्यांनी १४ फेब्रुवारीला रोजी दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. ही बाब गुरुवारी उघड झाली आणि आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली. जवळपास ४ दिवस ही बाब आरोग्य यंत्रणेने लपवून ठेवली. गुरुवारी त्याविषयी महापालिकेच्या आरोग्य विभागाने लस घेतलेले दोन डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याची अधिकृत माहिती दिली. हे दोन्ही डॉक्टर ज्येष्ठ असून, लस घेतल्यामुळे त्यांच्यात कोरोनाची अगदी सौम्य लक्षणे आढळली आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली.
डॉक्टर दाम्पत्य
लस घेतल्यानंतरही कोरोनाची बाधा झालेले हे दोन्ही डॉक्टर पती-पत्नी असल्याचे समजते. मात्र, याविषयी आरोग्य यंत्रणेने दुजोरा दिला नाही.
दुसरा डोस घेतल्यानंतर अँटीबॉडीज
कोरोनासोबत लढा देण्यासाठी अँटीबॉडी महत्त्वाची भूमिका निभावतात. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर साधारण २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. हा दुसरा डोस घेतल्यानंतर साधारण १४ ते १५ दिवसांनी अँटीबॉडीज तयार होऊन संरक्षण होत असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे.
‘कोव्हिशील्ड’चा डोस
या दोन्ही डॉक्टरांना सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जातो. परंतु दुसरा डोस घेण्यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली.
लसीमुळे गंभीर लक्षणे टळली
लसीमुळे दोन्ही डॉक्टरांत गंभीर स्वरूपाची लक्षणे टळली. केवळ सौम्य लक्षणे आहेत. त्यांना ''कोव्हिशील्ड'' लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यामुळे काही प्रमाणात प्रतिकशक्ती तयार झाली. दुसरा डोस दिल्यानंतर १४ ते १५ दिवसांनी अँटीबॉडीज तयार होतात.
-डॉ.नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा