मनपाच्या दोन्ही वॉर्डात रंगतदार लढत

By Admin | Published: August 24, 2016 12:31 AM2016-08-24T00:31:12+5:302016-08-24T00:49:25+5:30

औरंगाबाद : महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडेच चंचूप्रवेश करणाऱ्या मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाला औरंगाबाद महापालिकेच्या पोटनिवडणुकीस

In the two wards of the MMP, the colorful fight | मनपाच्या दोन्ही वॉर्डात रंगतदार लढत

मनपाच्या दोन्ही वॉर्डात रंगतदार लढत

googlenewsNext


औरंगाबाद : महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडेच चंचूप्रवेश करणाऱ्या मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाला औरंगाबाद महापालिकेच्या पोटनिवडणुकीस प्रथमच सामोरे जावे लागत आहे. २०१५ मध्ये मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये २५ नगरसेवक निवडून आणणाऱ्या पक्षाची बुढीलेन वॉर्ड क्र २१ मध्ये बरीच वाताहत झाली आहे. मतदानास प्रत्यक्ष चार दिवस बाकी असतानाही एमआयएम उमेदवार बॅकफूटवर दिसून येत आहे. वॉर्डात राष्ट्रवादी काँग्रेससह एका अपक्षानेही चांगलीच घोडदौड सुरू केली आहे.
मागील २५ वर्षांचा इतिहास बघितला तर बुढीलेन वॉर्डातील सुजाण नागरिकांनी नेहमीच काँग्रेसला कौल दिला. मागील निवडणुकीत एमआयएमच्या शकीला बेगम निवडून आल्या होत्या. त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. सध्या राष्ट्रवादीतर्फे परवीन कैसर खान, काँग्रेसतर्फे निखत एजाज झैदी, एमआयएमच्या शहेनाज बेगम खाजा मियाँ, अपक्ष म्हणून तरन्नुम अकील अहेमद निवडणूक रिंगणात आहेत. परवीन कैसर खान यांनी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मागील एक महिन्यात संपूर्ण वॉर्ड पिंजून काढला आहे. वॉर्डातील सर्व आजी, माजी उमेदवारांसह प्रतिष्ठित नागरिकांचा पाठिंबा त्यांनी मिळवून ठेवला आहे. राष्ट्रवादीच्या रणनीतीला छेद देण्याचा प्रयत्न मागील दोन ते दिवसांपासून काँग्रेसने सुरू केला आहे. किलेअर्क भागात अनुसूचित जातीचे मतदान सुमारे ५०० पेक्षा अधिक आहे. या मतांवर अपक्ष उमेदवार तरन्नुम अकील यांनी ‘लक्ष्य’ केले आहे. एमआयएमच्या उमेदवाराला प्रचारात गगनभरारी मिळालेली नाही. एमआयएमच्या पाठीशी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फारशी फौजही पाहायला मिळत नाही. आपला गड वाचविण्यासाठी एमआयएमची बरीच दमछाक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात सध्या तरी आघाडी घेतलेली आहे. राष्ट्रवादीचा हा राजकीय रथ थांबविण्यासाठी काँग्रेस, अपक्षाकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे.
औरंगाबाद : बेगमपुरा-पहाडसिंगपुरा वॉर्ड क्र. १२ मध्ये सुरू असलेल्या पोटनिवडणुकीत प्रचारासाठी आता उमेदवारांकडे फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे वॉर्डात राजकीय डावपेचांनीही अधिक वेग घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचा गढ असलेल्या या वॉर्डात खा. चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे निवडणूक लढवीत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. कालपर्यंत सेनेत असलेले अनिल भिंगारे यांना तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांनी बंडाचा झेंडा उगारला आहे. अपक्ष म्हणून त्यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. काँग्रेसची या वॉर्डात बरीच दमछाक होताना दिसून येत आहे.
बेगमपुरा-पहाडसिंगपुरा वॉर्डातील नागरिकांनी नेहमीच सेनेच्या बाजूने कौल दिला. या परिसरात कधीकाळी माजी आ. प्रदीप जैस्वाल यांचा बराच वरचष्मा होता. २०१५ च्या निवडणुकांमध्ये माजी नगरसेवक ज्ञानेश्वर जाधव अपक्ष म्हणून निवडून आले. त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार अनिल भिंगारे यांनी जोरदार प्रयत्न केले.
पोटनिवडणुकीत सेनेचे तिकीट आपल्यालाच मिळेल असा विश्वास त्यांना होता. ऐनवेळी सचिन खैरे यांची सेनेकडून वॉर्डात एन्ट्री झाली. आता खैरे यांच्या प्रचारासाठी सेनेचे सर्वच पदाधिकारी कामाला लागले आहेत. स्वत: चंद्रकांत खैरेही निवडणुकीत राजकीय डावपेच खेळत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने या वॉर्डात युती केली. काँग्रेसचे उमेदवार म्हणून संतोष भिंगारे निवडणूक रिंगणात आहेत. संतोष भिंगारे यांनी पहाडसिंगपुरा, नर्सेस क्वार्टर आदी परिसरात आपला बऱ्यापैकी जम बसविला आहे. जुन्या बेगमपुऱ्यातील आखाड्यात अजून त्यांना दम भरता आलेला नाही. एकंदरीत लढत सचिन खैरे विरुद्ध अनिल भिंगारे यांच्यातच होणार हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. येणाऱ्या चार दिवसांमध्ये बेगमपुऱ्याच्या राजकीय आखाड्यात कसे राजकीय डावपेच आखतात यावर विजयाचे ‘गणित’ अवलंबून राहील.

Web Title: In the two wards of the MMP, the colorful fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.