शेंद्रा एमआयडीसीजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोची दुचाकीला धडक, एकजण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 09:03 PM2018-06-28T21:03:44+5:302018-06-28T21:05:09+5:30
रस्त्याच्या विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात १ जण जागीच ठार तर १ जण गंभीर जखमी झाला.
करमाड (औरंगाबाद ) : रस्त्याच्या विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात १ जण जागीच ठार तर १ जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज दुपारी १ वाजता शेंद्रा एमआयडीसीजवळील घडली. गोरख विश्वनाथ गाडे (४३ रा. गणोरी ता.फुलंब्री) असे मृताचे नाव असून जितेंद्र गणेश पवार (३२ रा.गणोरी ता.फुलंब्री) हे गंभीर जखमी आहेत.
गोरख गाडे व जितेंद्र पवार हे मोटारसायकल(क्र. एम. एच.२० सी एक्स)वरून औरंगाबादहुन जालना येथे आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी चालले होते. ते शेंद्रा एमआयडीसी जवळ आले असताना विरुद्ध दिशेने येणारा टेम्पो (क्र. एम. एच.१४ बी जी २१७२) ने त्यांना जोरदार धडक दिली. यावेळी टेम्पोचे चाक गाडे यांच्या डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. तर जितेंद्र पवार हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे जखमीला औरंगाबाद येथील घाटी दवाखान्यात दाखल केले. अपघात होतात टेम्पोचालक घटनास्थळाऊन फरार झाला. पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आबासाहेब देशमुख, दिनकर थोरे करीत आहे.