अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार अभियंता ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:53 PM2019-06-10T23:53:01+5:302019-06-10T23:53:15+5:30
मित्रांसोबत ढाब्यावर पार्टी करून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वार दोन अभियंत्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी रात्री १ वाजेच्या सुमाराला सावंगी बायपासवरील नारेगाव फाट्याजवळ घडला.
औरंगाबाद : मित्रांसोबत ढाब्यावर पार्टी करून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वार दोन अभियंत्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी रात्री १ वाजेच्या सुमाराला सावंगी बायपासवरील नारेगाव फाट्याजवळ घडला.
प्रकाश दगडू इंगळे (२६, रा.नारेगाव), असे मृत अभियंत्याचे नाव आहे, तर मनोज रामेश्वर अंभोरे (२५, रा. महालपिंप्री) जखमी आहेत. शेंद्रा एमआयडीसीमधील ग्रीव्हज् कॉटन कंपनीत अभियंता म्हणून प्रकाश नोकरीला होते. मित्राच्या वाढदिवसानिमित्त झाल्टा फाटा येथील एका ढाब्यावर रविवारी रात्री पार्टी होती. या पार्टीसाठी प्रकाश आणि मनोज हे झाल्टा फाटा येथे गेले होते. रात्री १ वाजेच्या सुमाराला प्रकाश व मनोज हे मोटारसायकलने केम्ब्रिज चौकातून सावंगी बायपासने नारेगावकडे जात होते. नारेगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात प्रकाश आणि मनोज गंभीर जखमी झाले. दोघांनाही प्रथम खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकाश यांची प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास प्रकाश यांचा मृत्यू झाला, तर मनोज रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिकलठाणा पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक आबासाहेब देशमुख, पोहेकॉ थोरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. चिकलठाणा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.
चौकट
मित्रांची घाटी रुग्णालयात धाव
रात्री झालेल्या भीषण अपघातात प्रकाश इंगळे यांचा मृत्यू झाला आणि मनोज गंभीर जखमी असल्याचे कळताच त्यांच्या मित्रांनी घाटी रुग्णालयात सोमवारी सकाळी धाव घेतली. प्रकाश हे अविवाहित होते. प्रकाश अत्यंत सुस्वाभावी होते, असे त्यांच्या मित्रांनी सांगितले.