कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:41 PM2019-07-16T23:41:48+5:302019-07-16T23:41:59+5:30
भरधाव कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
वाळूज महानगर : वाळूजहून औरंगाबादकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे कामगार चौकालगत घडली. मनोज धोडिंराम वायकर (३३) असे मृताचे नाव आहे. तर हा प्रविण रमेश बांगड (५०) गंभीर जखमी झाला आहे.
प्र्रविण बांगड (रा. बजाजनगर), मनोज वायकर (रा. साईनगर सिडको), दिनेश दुधाट, विजय राजगुरु व सोनू परमार (रा. सर्व वडगाव कोल्हाटी) हे सोमवारी रात्री पंढरपुरातील एका हॉटेलमध्ये जेवनासाठी गेले होते. मध्यरात्रीनंतर २ वाजेच्या सुमारास ते घरी जाण्यास निघाले. प्रविण बांगड व मनोज वायकर हे दुचाकीने (एमएच-२०, बीएच- ०१०९) जात असताना कामगार चौकाजवळील प्रशांत पेट्रोल पंपासमोर अडीच वाजेच्या सुमारास वाळूजहून औरंगाबादच्या दिशेने जाणाºया भरधाव कंटेनरने बांगड यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली व भरधाव निघून गेला.
यात मनोज वायकर कंटेनरच्या मागच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. तर बांगड हे थोडक्यात बचावले. परंतू ते गंभीर जखमी झाले आहेत. तसेच दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, पाठीमागून येत असलेल्या दिनेश दुधाट याने घटनेची माहिती पोलीसांना दिली. स.फौजदार समीरोद्दीन सिद्दीकी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
बांगड यास उपचारकामी तर मृत मनोज वायकर याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, प्रवीण बांगड हा दुचाकी चालवत होता, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.