रस्त्यावर उभ्या मशीनला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:06 AM2021-03-04T04:06:35+5:302021-03-04T04:06:35+5:30
फुलंब्री : खुलताबाद मार्गावर किनगाव फाट्याजवळ मंगळवारी रात्री रस्त्यावर उभ्या असलेल्या मशीनला (रस्ता तयार करण्याचे यंत्र) दुचाकी धडकून ...
फुलंब्री : खुलताबाद मार्गावर किनगाव फाट्याजवळ मंगळवारी रात्री रस्त्यावर उभ्या असलेल्या मशीनला (रस्ता तयार करण्याचे यंत्र) दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू झाला. शिवनाथ गणेश नामेकर (३१), असे मयत तरुणाचे नाव आहे. रस्त्यावर उभ्या केलेल्या मशीनमुळे तरुणाचा जीव गेला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करा म्हणत किनगावच्या ग्रामस्थांनी बुधवारी रास्ता रोको केला. यानंतर मशीन चालकाविरोधात फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किनगाव येथील खाजगी पशुसेवक शिवनाथ गणेश नामेकर हे दुचाकी (क्र. एमएच २० इयू ६३१७)ने वाणेगावहून गावाकडे येत होते. खुलताबाद रस्त्याचे सिमेंट काम करणारे मिक्सर मशीन चालकाने रस्त्यातच उभे केले होेते. त्याला कुठलेही आवरण नसल्याने रात्री शिवनाथ नामेकर यांची दुचाकी या मशीनवर जोराने धडकली. यात डोक्याला मार लागून त्यांचा मृत्यू झाला. फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सदर मशीन चालकाविरोधात गुन्हा दाखल केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा घेत किनगाववासीयांनी बुधवारी सकाळी ११ वाजता रास्ता रोको केला. यानंतर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोनि. अशोक मुदिराज यांनी दिली.
फोटो कॅप्शन : १) मयत शिवनाथ नामेकर यांचा फोटो २) रस्त्यावर उभ्या असलेल्या मशीनला दुचाकी धडकली. ३) रास्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली होती.