ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By Admin | Published: May 14, 2014 12:22 AM2014-05-14T00:22:45+5:302014-05-14T00:29:02+5:30
वाळूज महानगर : अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना काल रात्री वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार चौकात घडली.
वाळूज महानगर : अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना काल रात्री वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार चौकात घडली. या अपघातात दुचाकीच्या पाठीमागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, पाटोदा येथील गणेश पुंडलिक भोकरे (३४) हे काल १२ मे रोजी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास गजानंद भुजंगराव काकडे यांना सोबत घेऊन दुचाकी क्रमांक एमएच-२०, सीटी-३३४१ वर स्वार होऊन वाळूज औद्योगिक क्षेत्रातून पाटोद्याकडे जाण्यासाठी निघाले होते. कामगार चौकातून वळण घेत असताना औरंगाबादकडून अहमदनगरकडे भरधाव वेगाने जाणार्या अज्ञात ट्रकने गणेश भोकरे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी होऊन गणेश भोकरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुचाकीच्या पाठीमागे बसलेले गजानंद काकडे हे जखमी झाले होते. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता फरार झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी गजानंद काकडे यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक फौजदार सागरसिंग राजपूत करीत आहेत. तीन अपघातांत चौघांचा बळी गेल्या तीन दिवसांपासून वाळूज परिसरात अपघात सत्र सुरूच आहे. या अपघातात चार जणांचा बळी गेला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ११ मे रोजी मुंबई- नागपूर हायवेवर खोजेवाडी शिवारात बीअर घेऊन जाणार्या ट्रकने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे किशोर जाधव व आकाश जाधव (रा. नागरे बाभूळगाव, ता. गंगापूर) या दोघा पिता-पुत्रांचा मृत्यू झाला होता, तर संगीता जाधव व एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला होता. याच महामार्गावर १२ मे रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शिर्डीहून लग्नसोहळा उरकून औरंगाबादकडे येणारी कार टेम्पोवर पाठीमागून धडकली होती. या अपघातात पवन राठी हा ठार झाला असून कारमधील प्रा. नंदकिशोर राठी, गीता राठी, कमल खटोड हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. गत तीन दिवसांत विविध अपघातांत ४ जणांचा बळी गेला असून, ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.