दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावले पादचारी महिलेचे मंगळसुत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 05:52 PM2018-09-15T17:52:20+5:302018-09-15T17:53:18+5:30
प्रसंगावधान राखून महिलेने मंगळसुत्र घट्ट पकडल्याने चोरट्यांच्या हाती केवळ ६० ते ७०टक्केच मंगळसुत्र लागले
औरंगाबाद : सिडको एन-९ येथील एका धार्मिक संस्थेत कार्यक्रमासाठी जाणाऱ्या पादचारी वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसुत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. यावेळी प्रसंगावधान राखून महिलेने मंगळसुत्र घट्ट पकडल्याने चोरट्यांच्या हाती केवळ ६० ते ७०टक्केच मंगळसुत्र लागल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली.
पोलिसांनी सांगितले की, हडको एन-११ गजानननगर येथील रहिवासी लता भीमराव कदम(वय ५८) या एका शाळेवर कार्यरत आहेत. शुक्रवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास त्या सिडको एन-९ येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी या संस्थेत कार्यक्रमासाठी पायी जात होत्या. संस्थेपासून अवघ्या काही अंतरावर त्या असताना समोरून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी अचानक त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावले. यावेळी कदम यांनी तातडीने मंगळसुत्र पकडले. मात्र चोरट्यांनी जोरात हिसका दिल्याने त्यातील निम्याहून अधिक मंगळसुत्र चोरट्यांच्या हाती लागले आणि तो सुसाट वेगाने तेथून निघून गेला.
यावेळी त्यांनी आरडाओरड केली, मात्र अंधार असल्याने त्यांच्या मदतीला कोणीही आले नाही. या घटनेत कदम यांच्या गळ्याला मंगळसुत्राचा दोरा काचल्याची माहिती पोलीस निरीक्षक निर्मला कदम यांनी दिली. या घटनेनंतर त्या घरी गेल्या.त्यानंतर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात आल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्यातील डी.बी. पथकाचे उपनिरीक्षक भरत पाचोळे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.याप्रकरणी सिडको ठाण्यात मंगळसुत्र चोरांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.