मित्राला बसस्थानकावर सोडून परतणाऱ्या दुचाकीस्वारास खाजगी बसने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:35 PM2019-02-28T12:35:48+5:302019-02-28T12:38:27+5:30
चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव खाजगी प्रवासी बसने चिरडले
औरंगाबाद : गारखेडा परिसरातील हिंदू राष्ट्र चौकात भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार एक तरुण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली.
अशोक रंगनाथ महाडिक (२२, रा. गजानन कॉलनी) असे मृताचे नाव असून, तो मंगळवारी रात्री त्याच्या मित्राला मध्यवर्ती बसस्थानकावर सोडण्यासाठी गेला होता. त्याला सोडून रात्री एक वाजेच्या सुमारास घरी येत असताना हिंदू राष्ट्र चौकात हा अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव खाजगी प्रवासी बसने (एमएच-२० डीडी २१५१) अशोकच्या दुचाकीस (एमएच-२० डीपी ८१५१) समोरून ठोकरले. त्यात अशोकच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि पाय मोडला. स्थानिक नागरिकांनी अशोक व त्याचा सहकारी पवन राजेंद्र कापडे यास घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी अशोक महाडिक यास तपासून मृत घोषित केले. जखमीवर घाटीत उपचार सुरू आहे.
ठाण्यात अकस्मात नोंद
महाडिक याचे शवविच्छेदन करून मृतदेह बुधवारी दुपारी नातेवाईकांना देण्यात आला. पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती. नातेवाईक अंत्यसंस्काराहून आल्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे पोहेकॉ. एकनाथ चव्हाण म्हणाले.
गतिरोधकाची गरज
नव्याने सिमेंट काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यावरून वाहने भरधाव पळविली जातात. या रस्त्याच्या दुतर्फा वसाहती आहेत. त्यामुळे वाहनांची गती कमी करण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची मागणी या भागातील रहिवासी युवराज दांडगे व अनेकांनी केली आहे.