कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार कामगार ठार : वाळूज एमआयडीसीत घडला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:04 AM2021-06-10T04:04:27+5:302021-06-10T04:04:27+5:30
वाळूज महानगर : काम संपल्यानंतर कंपनीतून दुचाकीने घरी परतणाऱ्या कामगारास कंटेनरने धडक दिली. त्यात कामगार गंभीर जखमी होऊन ठार ...
वाळूज महानगर : काम संपल्यानंतर कंपनीतून दुचाकीने घरी परतणाऱ्या कामगारास कंटेनरने धडक दिली. त्यात कामगार गंभीर जखमी होऊन ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि. ८) रात्री ११ वाजताच्या सुमारास वाळूज एमआयडीसीत घडली. या अपघातात कामगार सुभाष सोमीनाथ आरगडे (३२ रा. मनिषानगर, वाळूज) हे ठार झाले.
सुभाष सोमीनाथ आरगडे हे वाळूज एमआयडीसीतील ए.बी. इंजिनिअरिंग (सी-सेक्टर-१५८) या कंपनीत वायर कटिंग ऑपेरटर म्हणून काम करतात. मंगळवारी (दि. ८) नेहमीप्रमाणे ते कंपनीत गेले होते. रात्री ११ वाजता कंपनीतून ते दुचाकीने (क्रमांक एम.एच.२०, सी.ए. ७०१७) घरी निघाले होते. वाळूज एमआयडीसीतील क्रॉम्प्टन अॅण्ड ग्रीव्हज या कंपनीजवळ समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरने (एन.एल.०१, जी. ०६००) त्यांना जोराची धडक दिली. रस्त्याने ये-जा करणारे कामगार व वाहनधारकांनी जखमी आरगडे यांना मदत करीत एमआयडीसी वाळूज पोलिसांना माहिती दिली. त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून रात्री १२ वाजताच्या सुमारास सुभाष आरगडे यांना मृत घोषित केले.
कंटेनर चालक फरार
घटनास्थळी जमाव जमल्याने कंटेनर चालकाने तेथून पळ काढला. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात फरार कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र बांगर हे तपास करीत आहेत.
फोटो ओळ - वाळूज एमआयडीसीत अपघातास कारणीभूत कंटेनर व अपघातग्रस्त दुचाकी.
इन्सॅटमध्ये मृत कामगार सुभाष आरगडे.
--------------------------------